Coronavirus Vaccine News: सिरम इन्स्टिट्युटचं 'ते' ट्विट आलं अन् करोडो भारतीयांचं 'टेन्शन' वाढलं..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 04:56 PM2020-09-10T16:56:11+5:302020-09-10T17:05:46+5:30
ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्रॉझेनेकाकडून कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ या लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत.
पुणे : ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्रॉझेनेकाकडून कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ या लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत. बहुतेक ठिकाणी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. भारतातही पुण्यातील भारती हॉस्पीटलमध्ये दि. २६ ऑगस्टपासून दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना सुरूवात झाली. या लसीच्या यशस्वीतेची खात्री असल्याने ‘सिरम’कडून लसीचे उत्पादनही सुरू करण्यात आले आहे. मात्र, या लसीच्या चाचणीदरम्यान युकेमध्ये एका व्यक्तीमध्ये विपरीत परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे युकेसह अमेरिकेनेही या लसीच्या चाचण्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी भारतात सुरू असलेल्या चाचण्यांमध्ये कोणतेही विपरीत परिणाम दिसून आले नसल्याने त्या सुरूच राहतील असे बुधवारी (दि. १०) स्पष्ट केले होते. तसेच ‘डीसीजीआय’ने चाचण्या थांबविण्याबाबत सुचना केलेली नाही. ‘डीसीजीआय’ने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यास त्यांच्या सुचना व प्रोटोकॉलचे पालन करू, असे स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र, अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लसीच्या चाचणीमध्ये एका व्यक्तीवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आल्यानंतर युके तसेच अमेरिकेतील चाचण्या स्थगित करण्यात आल्या आहेत. आता भारतातील चाचण्याही थांबविण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्युटने घेतला आहे. ‘आम्ही भारताच्या औषध महानियंत्रकांच्या (डीसीजीआय) सुचनांचे पालन करत असून अॅस्ट्राझेनेका चाचण्या पुन्हा सुरू करेपर्यंत भारतातील चाचण्या स्थगित राहतील,’ अशी माहिती संस्थेने 'ट्विटर'द्वारे दिली आहे.
‘डीसीजीआय’नेही ‘सिरम’कडे चाचण्यांच्या परिणांबाबत विचारणा केली होती. त्यानुसार गुरूवारी संस्थेने ‘डीसीजीआय’च्या सुचनांचे पालन करत असल्याचे सांगत चाचण्या स्थगित केल्याचे जाहीर केले. ‘अॅस्ट्राझेनेका’कडून चाचण्या सुरू झाल्यानंतर भारतातील चाचण्या सुरू होतील, असेही सिरम इन्स्टिट्युट ने स्पष्ट केले आहे