सलेम - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आतापर्यंत चार हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या सव्वा लाखांच्या वर गेली आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. याच दरम्यान तामिळनाडूतील एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे. गेल्या ५ महिन्यांपासून त्या दोघांनी या क्षणाची वाट पाहिली होती, पण शुभ मंगल होण्यावर कोरोनाचं सावट, त्यात नवरी पॉझिटीव्ह निघाल्याने मोठी अडचण झाल. पण, सगळं पार पडलं.
विल्लुपुरम जिल्ह्यातील एका खासगी कंपनीत ती नोकरी करत होती. गुरुवारी रात्री ती थलैवासल शहराच्या सीमारेषेजवळ पोहोचली. तब्बल ३ जिल्हे पार करुन तीने २९४ किमीचा हा प्रवास केला होता. त्यामुळे, नियमानुसार तीची कोरोना चाचणी घेण्यात आली. तिरुपूर येथील गारमेंट कंपनीत काम करणाऱ्या तिच्या भावी जोडीदारासोबत रविवारी या दोघांचा विवाह संपन्न होणार होता. मात्र, शनिवारीच ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याची धक्कादायक बातमी समोर आली. तरीही, लग्नाची सर्व तयारी झाली असल्याने तिच्या नातेवाईकांनी लग्नसोहळ्यासाठी प्रशासनाकडे विनंती केली. मात्र, संबंधित बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शक्य नव्हती. अखेर, जिल्हाधिकाऱ्यांनीही बैठक घेऊन 5 अटींसह या लग्नसोहळ्याला परवानगी दिली. त्यामुळे, सोहळा पार पडला.
गंगावली येथील मुलाच्या घरीच हा लग्नसोहळा पार पडला, त्यानंतर नवऱ्या मुलासह २८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले. मानवतेच्या दृष्टीकोनातून मी या लग्नसोहळ्याला काही अटी व शर्तींसह परवानगी दिल्याचं सलेमचे जिल्हाधिकारी एसए रमन यांनी म्हटले आहे. सध्या या लग्नसोहळ्यातील नवरा-नवरीसह ३० जण क्वारंटाईन करण्यात आल्याचेही रमन यांनी सांगितले.
दरम्यान, देश कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सव्वा लाखांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सध्या देशभरात 31 मेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसविरोधात अद्याप प्रभावी असं औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. मात्र, इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे.