नवी दिल्ली: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची रुग्णांची संख्या भारतात देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधला. जगातील अनेक देशांप्रमाणेच कोरोनाशी दोन हात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या भारतातील १३० कोटी नागरिकांना नरेंद्र मोदी यांनी आज काही अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. जागतिक महामारीचा सामना करताना कोणती पथ्यं पाळायला हवीत, याबाबत मार्गदर्शन करतानाच, त्यांनी कोरोनावर विजय मिळवण्यासाठी एक मंत्रही दिला आहे.
आजघडीला कोरोनावर कुठलंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. अशावेळी, संकल्प आणि संयम या दोन गोष्टींची खबरदारी आपण घ्यायला हवी. संकल्प आणि संयम महामारीचा प्रभाव कमी करण्यात खूप मोलाची भूमिका बजावू शकतो असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच आपण तंदुरुस्त तर जग तंदुरुस्त हाच आजचा मंत्र असल्याचे नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना सांगितले आहे.
देशभरात येत्या रविवारी दिवसभर 'जनता कर्फ्यू' असं आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी केले आहे. २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ वाजता जनता कर्फ्यू पाळण्यात यावा, असं मोदींनी म्हटलं. कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत, याची तपासणी 'जनता कर्फ्यू'च्या माध्यमातून करूया, असं मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना सांगितले.
देशातील उच्चवर्गीय नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोदींनी आवाहन केलं आहे. आपण, सर्वसामान्य नागरिकांकडून ज्या ज्या सेवा घेता, त्यांना या संकटसमयी सुट्टी द्यावी. विशेष म्हणजे या नागरिक, कामगार आणि गरिब सेवाकरी व्यक्तींच्या आर्थिक हिताचाही विचार करावा. या काळात आपण सेवा खंडित केली म्हणून या कामगारांच्या पगारीत कपात करू नका, असा माझा आग्रह असल्याचे मोदींनी म्हटले. ज्याप्रमाणे तुम्हाला मला घरं चालवायचं आहे, तसेच या सेवा देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही आपलं घर चालवायचं असतं. त्यामुळे व्यापारी, उच्च वर्गीय व्यक्ती आणि लहान-मोठ्या संस्थांनी कंपनीत सेवा देणाऱ्यांचे वेतन न कापण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.