श्रीनगर, दि. 15 - जम्मू काश्मीरमधील आरएस पुरा सेक्टरमधील अरनिया परिसरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बिजेंद्र बहादूर सिंह असे शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. बिजेंद्र बहादूर सिंह हे सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. शुक्रवारीदेखील काश्मीरमधील आर.एस.पुरा सेक्टर परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशीरा 12 वाजून 25 मिनिटांनी पाकिस्तानकडून गोळीकार सुरू करण्यात आला. भारतीय लष्करानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात जवान बिजेंद्र बहादूर सिंह गंभीर जखमी झाले. यानंतर तातडीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या गोळीबारात एक स्थानिक नागरिकदेखील जखमी झाला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या गोळीबारात या वर्षात आतापर्यंत 52 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करही पाकिस्तानच्या कुरापतींना जशास तसे प्रत्युत्तर देत आहे.
अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी अबू इस्माईल ठार
दरम्यान, अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईल ठार झाला आहे. नौगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी अबू इस्माईलला ठार करण्यात आले आहे. अमरनाथमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अबू इस्माईल सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. अखेर त्याला ठार करण्यात भारतीय लष्कराच्या जवानांना यश मिळालं आहे. अबू इस्माईलसोबत आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे.
अबू इस्माईल पाकिस्तानी नागरिक आहे, अबू दुजानासोबत त्याने काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला होता. अमरनाथ दहशतवादी हल्ल्यानंतर बोलताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी अबू इस्माईल हल्ल्यात सहभागी होता, असे सांगितलं होते. मुनीर खान बोलले होते की, हा हल्ला तोयबानेच केला आहे. त्याची जबाबदारी अबू इस्माईलवर होती. त्याला स्थानिक दहशतवाद्यांनीही मदत केली'. महत्त्वाचं म्हणजे अबू दुजानाचा खात्मा केल्यानंतर जवानांनी अबू इस्माईल आणि हिजबूल, अलकायदाशी संबंधित झाकीर मूसा यांना ठार करण्यासाठी प्लान तयार केला होता अशी माहिती आहे.
अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 19 भाविक जखमी झाले होते. याआधी हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी ही माहिती दिली होती. अटक करण्यात आलेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे आहेत. हल्ल्याचा मास्टरमाईंड अबू इस्माईल आणि इतर तीन दहशतवादी मात्र त्यावेळी फरार होते.