लखनऊ: उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजीत यादवच्या हत्येचं रहस्य उलगडलं आहे. रमेशच्या आईनंच त्याची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. अभिजीत मद्यपान करुन घरी येऊन धिंगाणा घालायचा, म्हणून त्याची हत्या केल्याचं त्याच्या आईनं पोलिसांना सांगितलं. अभिजीतच्या मद्यपानाच्या सवयीला कंटाळून त्याची हत्या केल्याची कबुली आईनं दिली आहे. रमेश यादव यांचा मुलगा अभिजीतचा मृतदेह रविवारी हजरतगंजमधील त्याच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आला. या प्रकरणात यादव कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल केली. अभिजीत शनिवारी रात्री उशीरा घरी आला. त्यावेळी आपल्या छातीत दुखत असल्याचं त्यानं आईला सांगितलं. यानंतर आईनं त्याच्या छातीला मालीश केल्यावर अभिजीत झोपला. सकाळी त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या दृष्टीस पडला, अशी माहिती यादव परिवाराकडून पोलिसांना देण्यात आली. अभिजीतचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं भासवून कुटुंबानं त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा संशय आल्यानं पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले. यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं. यातून अभिजीतचा मृत्यू गळा दाबण्यात आल्यानं झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी सुरू केली. अभिजीतची आई आणि मोठ्या भावाची कसून चौकशी केल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला.
विधान परिषदेच्या सभापतीच्या मुलाची आईकडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 1:16 PM