गुवाहाटी - न्यायालयांनी दिलेले निर्णय आणि आदेशांमुळे जनतेच्या विश्वासावर प्रभाव पडतो; याची जाणीव न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे, असे मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले.
गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या एका ऑडिटोरियमच्या भूमिपूजन सोहळ्याला सरन्यायाधीश उपस्थित होते. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, "सरकारी कार्यालये आणि संस्थांपेक्षा न्यायालये वेगळी आहेत. कारण न्यायालये न्यायाच्या चक्राला पुढे सरकवण्यासाठी दररोज सर्व पक्षकारांना मदत करत असतात. त्यामुळे न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांनी न्यायालयांनी दिलेले निर्णय आणि आदेशांमुळे जनतेच्या विश्वासावर प्रभाव पडतो; याची जाणीव ठेवली पाहिजे."
"जनतेच्या ज्या विश्वासावर आपल्या संस्थेचे अस्तित्व कायम आहे, तो विश्वास आपले आदेश आणि निकालांच्या आधारावर बनलेला आहे. याची जाणीव न्यायाधीश आणि अन्य न्यायिक अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे,"असा सल्लाही सरन्यायाधीशांनी यावेळी दिला.
दरम्यान, सद्यस्थितीत काही व्यक्ती आणि समुहांकडून हिंसक आणि बेफिकीर व्यवहार दिसून येत आहे. मात्र असे प्रकार केवळ अपवाद असून, देशाच्या भक्कम न्यायिक संस्थाच्या परंपरेकडून पराभूत ते पराभूत होतील, असा विश्वासही सरन्यायाधीशांनी व्यक्त केला.