प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध कल्पित बातम्यांना न्यायालयाची मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 02:14 AM2019-11-17T02:14:29+5:302019-11-17T02:14:42+5:30
मुंबईतील जमिनीशी केलेल्या व्यवहाराच्या पुष्टी न मिळालेल्या वा सांगोवांगी माहितीच्या बातम्या छापण्यास किंवा प्रसारित करण्यास माध्यमांना मनाई करणारा आदेश न्यायालयाने दिला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या सीजे उद्योग समूहातील कंपनीने इकबाल मिर्ची याच्या पत्नीशी मुंबईतील जमिनीशी केलेल्या व्यवहाराच्या पुष्टी न मिळालेल्या वा सांगोवांगी माहितीच्या बातम्या छापण्यास किंवा प्रसारित करण्यास माध्यमांना मनाई करणारा आदेश न्यायालयाने दिला आहे.
सात अग्रगण्य वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या व वृत्तविषयक वेबपोर्टलविरुद्ध पटेल यांनी दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश टिष्ट्वंकल वाधवा यांनी हा अंतरिम आदेश दिला. या व्यवहारात मनीलाँड्रिंगच्या आरोपावरून सीबीआय व ईडी यांचा तपास पूर्ण होऊन त्यांनी आरोपपत्र दाखल करेपर्यंत वा पुढील आदेश होईपर्यंत हा मनाई आदेश लागू राहील.
पटेल यांचे वकील अॅड. विजय अग्रवाल यांनी न्यायालयाला सांगितले की, प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केलेला व्यवहार प्रामाणिक असून, त्याचा दाऊद इब्राहीम वा इक्बाल मिर्चीशी संबंध नाही. ईडीने याच संबंधात इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्याच्या तपासात साक्षीदार म्हणून पटेल यांना जबाबासाठी बोलावले गेले होते. स्वत: पटेल यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली होती.
तरीही पटेल हेच या प्रकरणात आरोपी आहेत, अशा ढंगाने बातम्या दिल्या जात आहेत.
पटेल यांचे इक्बाल मिर्ची व पर्यायाने दाऊदशी संबंध जोडून त्याचाही तपास केला जात असल्याच्या बातम्या ईडी व सीबीआयमधील सूत्रांच्या नावाने दिल्या जात आहेत. हा पटेल यांचे निष्कारण चारित्र्यहन करण्याचा प्रकार आहे, असेही अॅड. अग्रवाल यांनी निदर्शनास आणले.
न्यायालयाने प्रतिवादी माध्यमांचेही म्हणणे ऐकून नमूद केले की, माध्यमांना सत्याच्या व अधिकृत पुष्टी झाली आहे अशा माहितीच्या आधारे बातम्या देण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, हे स्वातंत्र्य उपभोगताना त्यांनी इतरांच्या इभ्रतीचेही भान ठेवायला हवे.
बातम्या मिलेनियम कंपनी व हाजरा मिरची यांच्या जमीनविषयक करारातील माहितीच्या आधारे असतील त्यात काही गैर नाही; पण त्या कराराच्या आडून आणि तपासी यंत्रणांनी अधिकृत माहिती दिली नतताना सवंग बातम्या देऊन पटेल यांनी प्रतिमा मलिन करणे गैर
आहे.
आक्षेपार्ह बातम्या मागे घ्या
या जमीन व्यवहाराच्या अनुषंगाने, तपास यंत्रणांचा तपास पूर्ण होऊन त्यांनी अहवाल न्यायालयात सादर करेपर्यंत पुष्टी नसलेल्या माहितीच्या आधारे पटेल यांचे चारित्र्यहन होईल, अशा बातम्या छापण्यास वा प्रसारित करण्यास प्रतिवादी माध्यमांना अंतरिम मनाई करण्यात येत आहे. त्यांनी याआधी प्रसिद्ध वा प्रसारित केलेल्या अशा आक्षेपार्ह बातम्याही मागे घ्याव्यात, असेही न्यायालयाने सांगितले.