दोन हत्या प्रकरणी राम रहीमविरोधात आज कोर्टात सुनावणी, पंचकुलामध्ये कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 09:06 AM2017-09-16T09:06:40+5:302017-09-16T09:47:13+5:30
साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम विरोधात शनिवारी आणखी दोन हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे.
पंचकुला, दि. 16 - साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम विरोधात शनिवारी आणखी दोन हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राम रहीमवर सिरसा येथील पत्रकार राम चंद्र छत्रपती आणि डे-याचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येचा आरोप आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश जगदीप सिंह यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे. याच कोर्टाने 25 ऑगस्टला राम रहीमला साध्वींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले होते.
हरयाणामधील पंचकुला येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. चकुला येथील सेक्टर एकमधील न्यायालयाच्या आवारात आणि आजूबाजूच्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी निमलष्करी दल आणि पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती, हरयाणाचे पोलीस महासंचालक बीएस संधू यांनी दिली आहे. दरम्यान, गुरुमीत राम रहीम याच्यावरील बलात्कार प्रकारणाची सुनावणी करतेवेळी पंचकुला परिसरात त्याच्या एक लाखहून अधिक समर्थकांनी धुडगूस घातला होता.
तसेच, त्यांनी माध्यमांच्या ओबी व्हॅन्ससह इतर वाहनांची जाळपोळ केली होती. मात्र, आता या परिसरात एकही समर्थक याठिकाणी आला नसल्याची माहिती सुद्धा पोलीस महासंचालक बीएस संधू यांनी दिली. याचबरोबर, गुरमीत राम रहिम याला उद्या हत्येप्रकरणाची सुनावणी करण्यासाठी त्याला सीबीआयच्या कोर्टात हजर करण्याची शक्यता कमी आहे. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेलमध्येच होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम याला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 38 जण ठार झाले. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहे. दरम्यान, गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेरा सच्चा सौदाचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांची हत्या 2002 मध्ये झाली होती.
Haryana: Security tightened in Panchkula as hearing in two murder cases against #RamRahim to take place today pic.twitter.com/PXk19s3o50
— ANI (@ANI) September 16, 2017