मेजर लितूल गोगोई यांच्याविरोधात कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 03:35 PM2018-06-04T15:35:43+5:302018-06-04T15:40:55+5:30
काश्मिरी तरुणीला श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांच्याविरोधात कोर्ट ऑफ इन्क्वायरीस सुरुवात झाली आहे.
श्रीनगर - काश्मिरी तरुणीला श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांच्याविरोधात कोर्ट ऑफ इन्क्वायरीस सुरुवात झाली आहे. ही चौकशी श्रीनगर येथील एचक्यू 15 कोअर येथे ब्रिगेडिअर अनुराग यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी मेजर गोगोई हे एका काश्मिरी तरुणीला हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादात सापडले होते. त्यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबत त्यांची वादावादीही झाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.
या तपासादरम्यान घटना घडली त्यावेळच्या परिस्थितीचा अभ्यास केला जाईल. तसेच कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा अहवालही लवकरात लवकर दाखल करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भारतीय लष्कराने मेजर गोगोई यांच्याविरोधात कडक भूमिका स्वीकारली होती. तसेच लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीही, मेजर गोगोई हे दोषी आढळल्यास त्यांच्यावर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते. लष्करप्रमुखांच्या या वक्तव्यानंतर लष्कराने मेजर गोगोई यांच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले होते.
मे महिन्यामध्ये मेजर लीतुल गोगोई यांनी श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. बुधवारी गोगोई हे हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांचासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. कर्मचाऱ्यांनी तरूणीचं ओळख पत्र तपासलं असता ती बडगामची रहिवासी असल्याचं समोर आलं. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असं हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितलं. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. कर्मचाऱ्यांशी वाद झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण पोलिसांकडे गेल्याने गोगोई यांची चौकशी करण्यात आली होती.