नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीनं जगासमोर नवं संकट उभं केले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत होते. त्याचेच यश म्हणजे कोरोनापासून बचावासाठी लस विकसित करण्यात आली. भारतातही कोव्हॅक्सिन(Covaxin) स्वदेशी लस निर्माण करण्यात आली. जानेवारी महिन्यापासून भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून आज भारत लसीकरणात ऐतिहासिक पाऊल टाकत आहे.
भारत आज १०० कोटीपेक्षा जास्त लसीच्या डोसचा आकडा पार करू शकतो. या मोहिमेनं ऐतिहासिक टप्पा ओलांडल्याबद्दल केंद्र सरकार जल्लोषाची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १०० कोटींचा आकडा पार करताच त्याची घोषणा सर्वत्र केली जाणार आहे. एकाचवेळी लाऊड स्पीकरवरुन विमान, जहाज, बंदर, मेट्रो, रेल्वे स्टेशन, बस स्टँड याची उद्घोषणा होणार आहे.
भाजपाचा महाजल्लोष
भारताने १०० कोटी डोसचा ऐतिहासिक टप्पा ओलांडताच भाजपा(BJP) कार्यकर्त्यांकडून महाजल्लोष साजरा केला जाणार आहे. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव केला जाईल. विमान कंपनी स्पाइस जेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या फोटोसह १०० कोटी लस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पोस्टर विमानावर लावणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह म्हणाले की, आज भाजपाचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी देशभरात या जल्लोषात सहभागी होतील. पक्षाचे लोकप्रतिनिधी जिथे असतील तेथील लसीकरण केंद्रावर जातील आणि तेथील कर्मचाऱ्यांचा सन्मान करतील.
डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी आणि अन्य कोविड वॉरियर्सचा सन्मान
या कार्यक्रमातंर्गत लसीकरणाशी निगडीत डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी आणि अन्य कोविड वॉरियर्सचा सन्मान केला जाणार आहे. त्याचसोबत लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी लोकांना लसीकरण सेंटरपर्यंत आणणे आणि परत त्यांच्या घरी सोडणे यासाठी पिक अँन्ड ड्रॉपची सुविधा भाजपा कार्यकर्त्यांकडून दिली जाणार आहे. देशभरात १०० कोटी लसीकरण पार पाडण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सशक्त नेतृत्वामुळे शक्य झाल्याचं भाजपाचं म्हणणं आहे.
भाजपाचे अध्यक्ष जे.पी नड्डा गाजियाबाद दौऱ्यावर
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा गाजियाबाद येथील लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मानित करतील. त्याआधी इंदिरापुरम येथील मानसरोवर भवन येथे पाहणी करून लसीकरण मोहिमेच्या यशासाठी आभार प्रदर्शन कार्यक्रमात सहभागी होतील.