अहमदाबाद-
गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यावर एका मोकाट गायीनं हल्ला केला आहे. मेहसाणा जिल्ह्यात भाजपानं आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेदरम्यान हा प्रकार घडला आहे. गायीच्या हल्ल्यात नितीन पटेल यांच्या पायाला दुखापत झाली असून नजिकच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' मोहिमेचं आयोजन केलं आहे. तसंच देशभरात भाजपा नेत्यांकडून तिरंगा यात्रेचंही आयोजन केलं जात आहे. गुजरातमध्येही तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल सहभागी झाले होते. पण यात्रा सुरू असतानाच एक मोकाट गाय गर्दीत शिरली. अंदाधुंद पळत सुटलेल्या गायीनं नितीन पटेल यांना धडक दिली. यात नितीन पटेल जखमी झाले. कडी जिल्ह्यात यात्रा एका बाजारात पोहोचली असता हा प्रकार घडला आहे.
नितीन पटेल यांच्यासोबत घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते सरल पटेल यांनीही या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
नितीन पटेल यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पायाचा एक्स-रे करण्यात आला. एक्स-रेमध्ये त्यांच्या डाव्या पायाला किरकोळ फ्रॅक्चर झालं असल्याचं निष्पन्न झालं आहे. डॉक्टरांनी उपचार करत नितीन पटेल यांना २० ते २५ दिवसांचा आराम करण्याचा सल्ला दिला आहे.