Coronavirus : निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातच्या मरकजला 'हवाला फंडिंग'? चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 09:48 AM2020-04-09T09:48:25+5:302020-04-09T10:07:14+5:30
क्राइम ब्रांचने मरकजला होणारा अर्थपुरवठा आणि हवाला कनेक्शनच्या चौकशीसाठी गेल्या 3 वर्षांतील आयकर भरल्याची माहिती, पॅन कार्ड क्रमांक, बँक अकाउंटची माहिती आणि बँक स्टेटमेंटची माहिती मागीतली असल्याचे मानले जात आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातचा मरकज हा देशातील कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या क्राईम ब्रांचने बुधवारी मरकजमध्ये पुन्हा एकदा छापा टाकला. क्राईम ब्रांच मरकजला हवालामार्गे अर्थपुरवठा होतो का? यासंदर्भातही तपास करत असल्याचे समजते. यासाठी पोलीस काही संघटना आणि लोकांची चौकशीही करत आहे.
क्राइम ब्रांचने मरकजला होणारा अर्थपुरवठा आणि हवाला कनेक्शनच्या चौकशीसाठी गेल्या 3 वर्षांतील आयकर भरल्याची माहिती, पॅन कार्ड क्रमांक, बँक अकाउंटची माहिती आणि बँक स्टेटमेंटची माहिती मागीतली असल्याचे मानले जात आहे. एवढेच नाही, तर जानेवारी 2019पासून ते आतापर्यंत मरकजमध्ये झालेले सर्व धार्मिक कार्यक्रम आणि त्यावर झालेला खर्च, तसेच मरकजमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे का आणि जर लावले आहेत तर ते कुठे-कुठे लावण्यात आले आहेत. यासंदर्भातही क्राइम ब्रांचने माहिती मागितली आहे. क्राइम ब्रांचचा चमू बुधवारीही पुन्हा एकदा मरकजमध्ये पोहोचला होता. यावेळीही त्यांनी जवळपास तीन तास संपूर्ण मरकजची पाहणी केली. तसेच परिसरातील लोकांना काही विचारपूसही केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मरकजला हवालामार्गे अर्थपुरवठा होत होता. हा अर्थपुरवठा सौदी शिवाय इतर काही देशांतूनही होत होता. हा अर्थपुरवठा 2005नंतर सुरू झाला. यामुळेच आता क्राइम ब्रांच मरकजचे काही हवाला कनेक्शन आहे का? यासंदर्भात तपास करत आहे.
क्वारंटाईन असल्याचे सांगून उत्तर द्यायला नकार -
दिल्लीच्या निझामुद्दीनस्थित तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती. त्यांना क्राईम ब्रांचच्या पथकाने मरकजसंबंधी 26 प्रश्नांची उत्तरे मागितली होती. मात्र, या नोटीसला उत्तर देताना मौलाना साद यांनी आपली एक ऑडिओ क्लिप जारी केली. यात त्यांनी, आपण क्वारंटाईनमध्ये आहोत. सध्या मरकज सील आहे, जेव्हा मरकज उघडले जाईल तेव्हाच या प्रश्नांची उत्तरे देता येतील, असे म्हटले होते. याशिवाय मौलाना साद यांच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेही टाकले होते.