वाराणसी : माध्यान्ह भोजनात शाळेतील विद्यार्थ्यांना पोळीसोबत फक्त मीठ दिल्याची बातमी देणाºया पत्रकाराविरुद्ध उत्तर प्रदेश सरकारने गुन्हा दाखल केला आहे.मिर्झापूर जिल्ह्यातील शिवूर येथील प्राथमिक शाळेतील मुलांना माध्यान्ह भोजनात पोळीसोबत फक्त मीठ देण्यात आल्याची बातमी पत्रकार पवन जैस्वाल यांनी दिली होती. जैस्वाल आणि गावचे सरपंच राजकुमार पाल यांच्याविरुद्ध मिर्झापूर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी तक्रार दिली. या दोघांविरुद्ध भारतीय दंडविधानाचे कलम १८६ (सरकारी नोकराला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून अडथळा आणणे), कलम १९३ (खोटे पुरावे), कलम १२० बी (गुन्हेगारी कट) आणि कलम ४२० (फसवणूक) अन्वये गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस अधिकाºयाने सांगितले. मिर्झापूरचे पोलीस अधीक्षक अवधेश कुमार पांडेय यांनी पाल यांना अटक झाल्याचे सांगितले.
शिवूरच्या शाळेत मुलांना ताटात फक्त पोळीच दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला व हा व्हिडिओ जिल्हा दंडाधिकाºयांनाही पाठवला गेल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केले गेले. जिल्हादंडाधिकाºयांनी चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली. चौकशीत तो व्हिडिओ हेतूत: बनवण्यात आला होता, असे उघड झाले.