नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यामध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरूणी आपल्या प्रेयसीसोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. समलैंगिक संबंधांच्या या प्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला असून पोलीसही हैराण झाले आहे. पत्नी पळून गेल्याचं समजताच अवघ्या एक दिवसापूर्वी तिच्यासोबत लग्नबंधनात अडकलेल्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लॅस्टी करावी लागली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि नातेवाईक पळून गेलेल्या तरुणींचा शोध घेत होते. खूप शोध घेतल्यानंतर मदुराईमध्ये तरुणी तिच्या प्रेयसीसोबत राहत असल्याची माहिती समोर आली. सहा दिवसांच्या तपासानंतर तरुणीला शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. तरुणीला आधीपासूनच तिच्या प्रेयसीसोबत राहण्याची इच्छा होती. मात्र लग्नामध्ये माहेरच्यांकडून मोठ्याप्रमाणात सोनं मिळेल हे माहीत असल्याने तिने लग्न केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. 24 ऑक्टोबर रोजी या तरुणीचं त्रिशूरमधील चावाकड येथे राहणाऱ्या तरुणासोबत लग्न झालं.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीच 'ती' प्रेयसीसोबत दागिने घेऊन पसार
तरुणाने लग्न करुन घरी आणलेली पत्नी दुसऱ्याच दिवशी 25 ऑक्टोबर रोजी अचानक बेपत्ता झाली. पोलिसाने स्थानिक पोलीस स्थानकात याबाबत तक्रार नोंदवली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी चेरपूर येथील एका बँकेत हे दोघे काही कामानिमित्त गेले होते. बँकेमध्ये नवरा काही कामानिमित्त थांबला असताना या तरुणीने त्याच्याकडून त्याच्या मोबाईल मागून घेतला. आपण आपल्या एका मैत्रिणीला भेटून काही वेळात आलोच असं सांगून ही तरुणी दुचाकीवरुन नवऱ्याचा मोबाईल घेऊन निघून गेली पण ती त्यानंतर परतलीच नाही. शेवटी परत न आल्याने पतीने पोलिसांत धाव घेतली.
तपासामध्ये या तरुणीने तिच्या प्रेयसीसोबत चेन्नईला पळून जाण्यासाठी त्याच दिवशी त्रिशूर ते चेन्नई तिकीट बूक केल्याची माहिती समोर आली. मात्र चेन्नईला जाण्याऐवजी या दोघी बसने कोट्टयमला गेल्या. नंतर दुसऱ्या दिवशी या दोघी ट्रेनने चेन्नईला गेल्या. त्यानंतर त्या चेन्नईवरुन मदुराईला गेल्या जिथे त्या एका लॉजमध्ये थांबल्या होत्या. मदुराईमध्ये एक दिवस राहिल्यानंतर त्या पुन्हा त्रिशुरला परतल्या. रेल्वे स्थानकावर पार्क केलेल्या दुचाकीची व्यवस्था करण्यासाठी त्या परतल्या होत्या. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात यश आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.