अरे देवा! अचानक बँक खात्यात आले कोट्यवधी रुपये पण...; न्यायासाठी 'तो' मागतोय दाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 01:27 PM2023-11-18T13:27:39+5:302023-11-18T13:39:42+5:30
मोहम्मद अस्लम रातोरात करोडपती बनून सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. मात्र अस्लमच्या अडचणी आता वाढल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या उपरकोट नगर कोतवाली परिसरातील भुजपुरा येथील रहिवासी असलेला मोहम्मद अस्लम रातोरात करोडपती बनून सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. मात्र अस्लमच्या अडचणी आता वाढल्या आहेत. तो न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागत आहे. सध्या सायबर गुन्हे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
दिवाळीत अस्लमच्या दोन बँका IDFC आणि UCO खात्यात जवळपास 4.78 कोटी रुपये आले होते. यानंतर त्याने आपल्या दोन्ही बँक मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली आणि पोलिसांतही तक्रार केली. मॅनेजरने अस्लमचं अकाऊंट फ्रिज करण्याची सूचना दिली. परंतू मोहम्मद अस्लम याने आता आरोप केला आहे की त्याचे खाते 13 नोव्हेंबर रोजी फ्रिज आले होते, तरीही त्याच्या खात्यात पैसे येण्याची प्रक्रिया थांबत नाही.
14 नोव्हेंबर रोजी अस्लमच्या खात्यातून सुमारे 7 कोटी रुपये बँकेने काढले. आता नाराज झालेल्या अस्लमने एसएसपी कार्यालय गाठून तक्रार केली आहे. बँकेने त्याला आता नोटीस दिली आहे की त्याचं खातं मायनसमध्ये असून त्याला आता पैसे द्यावे लागणार आहेत.
या अनोख्या प्रकरणात अस्लमने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळावा, असं आवाहन केलं आहे. अस्लमने यापूर्वीच बँक आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती, आता सायबर क्राईम तपास करत आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.