श्रीनगर -कोरोनामुळे जेवढी माणूसकी लोकांनी पाहिली, तेवढीच माणूसकी हरपल्याचंही पाहायला मिळालं आहे. आपण कामसंबंधी किंवा मित्रपरिवाराला फोन केल्यास सुरुवातील कोरोनाविरुद्ध लढण्याची, काळजी घेण्याची रिंगटोन वाजते. त्यामध्ये, संबंधित महिला, आपली लढाई रोगाशी आहे, रोग्याशी नाही असे आवर्जून सांगते. मात्र, अद्यापही कोरोनाबद्दलची भीती माणसांच्या मनात असल्याने ही लढाई रोग अन् रोग्यांशी असल्याची प्रचिती येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी अशीच माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली.
जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या अंत्यंसंस्कारावेळी गोंधळ उडाला. यातून जमावाने हल्ला केल्यामुळे नातेवाईकांनी अर्धे जळालेले प्रेत घेऊन पळावे लागले. मात्र, प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन दुसऱ्या ठिकाणी मृतदेहावर नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत व्यक्तीच्या मुलाने सांगितल्यानुसार, डोडा जिल्ह्यातील रहिवाशी असलेले ७२ वर्षीय व्यक्तीचा सोमवारी जम्मूतील राजकीय चिकित्सा महाविद्याल रुग्णालयात मृत्यू झाला. संबंधित रुग्ण हा कोविड १९ चा पॉझिटीव्ह होता. जम्मू भागातील कोविड १९ च्या प्रादुर्भावाने झालेला हा चौथा मृत्यू आहे.
एका सनदी अधिकारी आणि आरोग्य विभागातील पथकाच्या मदतीने आम्ही वडिलांवर अंत्यसंस्कार करत होतो. डोमना परिसरातील स्मशानभूमीत चितेला अग्नीही देण्यात आला होता. त्याचवेळेस मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांनी स्मशानभूमीत एकत्र येत गोंधळ घालत अंत्यसंस्कार विधी थांबवला. त्यावेळी, माझी आई व आम्ही दोन भावंड उपस्थित होतो, असे मृत व्यक्तीच्या मुलाने सांगितले. स्मशानात आलेल्या जमावाने आमच्यावर दगडफेक करुन काठीच्या सहाय्याने मारहाणही केली. त्यामुळे भीतीच्या कारणाने अर्धा जळालेला मृतदेह घेऊन नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून दुसरीकडे धूम ठोकली.
आम्ही आमच्या रहिवाशी जिल्ह्यात अंत्यसंस्कारासाठी परवानगी मागितली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला जिथं मृत्यु झाला तिथेच अंत्यंस्कार करण्याचे बजावले. त्यामुळे, आम्ही अंत्यसंस्कार विधीला सुरुवात केली, पण अचानक स्थानिक जमावाने एकत्र येऊन आमच्यावर हल्ला केला. त्यावेळी, उपस्थित दोन पोलीसांनी आमची मदत केली नाही, असेही पीडित मुलाने सांगितले. त्यानंतर, रुग्णवाहिकेतून आम्ही भगवती नगर परिसरातील स्मशानभूमीत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष अंत्यसंस्कार केले. मात्र, सरकारने कोविड १९ रुग्णांच्या अंत्यविधीसाठी खास उपाययोजना करणे गरजेचं असल्याचेही त्यांनी म्हटलं.