CRPF जवानानेच केली पुतळ्याची विटंबना, सीसीटीव्हीतून झालं उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 04:41 PM2018-03-22T16:41:42+5:302018-03-22T16:41:42+5:30
35 वर्षीय सेंथिल कुमार याला स्क्रिझोफेनियाचा आजार जडला आहे.
चेन्नई: काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या पुडूकोट्टणी येथे पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले होते. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर समाजातील अनेक स्तरांवरून टीका झाली होती. परंतु, आता या प्रकरणात एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना समाजकंटकांनी नव्हे तर सीमा सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) सेंथिल कुमार या जवानाने केली होती. या जवानाला पोलिसांनी अटक केली आहे.
या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सेंथिल कुमार पुतळ्याच्या चबुतऱ्यावर चढून पेरियार यांच्या पुतळ्याच्या डोके तोडताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर सेंथिल कुमारने पुतळ्याचे डोके जवळच्या चौकात फेकून दिल्याचेही सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध झाले आहे. पोलीस चौकशीदरम्यान सेंथिल कुमारनेही आपण दारूच्या नशेत पुतळ्याची तोडफोड केल्याची कबुली दिली.
दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर CRPF कडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार 35 वर्षीय सेंथिल कुमार याला स्क्रिझोफेनियाचा आजार जडला आहे. त्याच्यावर गेल्या महिन्याभरापासून उपचार सुरू होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित करण्यात आल्याचेही CRPF कडून सांगण्यात आले.