चेन्नई - 'तितली' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. 15 नोव्हेंबरला कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.
'गज' चक्रीवादळ चेन्नईच्या ईशान्येकडे 860 किलोमीटर अंतरावर असून ते ताशी 12 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. पुढच्या 24 तासात या वादळाचे रुपांतर भीषण चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विशेषतः हे वादळ तामिळनाडूतील नागपट्टणम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी येथील कराईकल येथील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
'गज' या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग, केरळमधील काही भागात येत्या बुधवारी जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मच्छिमारांना 12 नोव्हेंबरपासून समुद्रात न जाण्याची सूचनाही देण्यात आली होती.
'गज' चक्रीवादळा आधी तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले होते. या चक्रीवादळा दरम्यान ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होते. तितली हे चक्रीवादळ भयंकर असून बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसला होता.