कोलकाता : यास चक्रीवादळामुळे (Yass Cyclone) पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. तसेच, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणाऱ्या धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान यास चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 1 कोटी जनता प्रभावित झाल्याचे म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा दक्षता समित्या आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यानंतर ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 1 कोटी जनता प्रभावित झाल्याचे सांगितले. तसेच, 15 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये तीन लाखांपेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पूर्व मेदिनीपूर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा भागांचा दौऱ्या करणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. याशिवाय, चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी एक कोटींची मदत ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली आहे.
बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा प्रकोपपश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा प्रकोप पाहायला मिळाला. दक्षिण 24 परगण्यात एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. येथील लोकांच्या मदतीसाठी हा जेसीबी आणण्यात आला होता. मात्र, याठिकाणी रस्त्यावर पावसामुळे प्रचंड पाणी साचले आहे. या पाण्यात हा जेसीबी बुडाला. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तत्पूर्वी मंगळवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नैहाती आणि हलिहारमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले.
ओडिशाच्या धामरा जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती, NDRF कडून मदतकार्य सुरुओडिशात यास चक्रीवादळामुळे भद्रक जिल्ह्यातील धामरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे धामरा जिल्ह्यात मोठे नुकसान झालेले आहे. NDRF च्या टीम्स बचावकार्य करत आहेत. वादळामुळे कोसळलेली झाड हटवण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. ओडिशामध्ये किनाऱ्यावरील बोटी, दुकाने, पोलिसांची बॅरिकेट्स यांचे उदयपूरजवळ नुकसान झाले आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या बार्डरवरील पोलिसांचे बॅरिकेटस उडून गेली आहेत.
झारखंडमध्ये हाय अलर्ट!ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात थैमान घातल्यानंतर आता यास चक्रीवादळाने झारखंडच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. या तिन्ही राज्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिवसभरात सुमारे 12 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मात्र, आता झारखंडला हाय अलर्ट देण्यात आला आहे. "यास चक्रीवादळाने त्याची लँडफॉलची प्रक्रिया दुपारी अडीचच्या सुमारास पूर्ण केली आहे. मात्र, या भागामध्ये उद्या दुपारपर्यंत पाऊस राहणार आहे. उद्या म्हणजेच 27 मे रोजी सकाळपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. कारण समुद्र या काळात खवळलेला असेल", अशी माहिती भुवनेश्वर वेधशाळेतील ज्येष्ठ वैज्ञानिक उमाशंकर दास यांनी दिली आहे.