लखनऊ - देवबंद (उत्तरप्रदेश) येथील इस्लामिक शिक्षण देणाऱ्या दारुल उलूम या संस्थेने मुस्लिम महिलांनी केस कापणे तसंच आय ब्रो करणं धर्मविरोधी असल्याचं जाहीर केलं आहे. दारुल उलूमतर्फे मौलाना सादिक काजमी यांनी फतवा जारी केला आहे. फतव्यामध्ये हे सर्व इस्लामविरोधीत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच दारुल उलूमने फार पुर्वीच हा फतवा जारी करायला हवा होता असं मौलाना सादिक काजमी बोलले आहेत.
काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीने दारुल उलूमच्या फतवा जारी करण्याला विभागाला मुस्लिम महिलांना केस कापण्याची आणि आय ब्रो करण्याची परवनागी आहे का असा प्रश्न विचारला होता. उत्तरादाखल मौलाना सादिक काजमी यांनी हे इस्लामच्या विरोधात असल्याचं सांगितलं आहे. मुस्लिम महिलांसाठी ज्या दहा गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात दोन्हींचा समावेश असल्याचं मौलाना सादिक काजमी बोलले आहेत. सोशल मीडियावर मात्र या फतव्याविरोधात खिल्ली उडवली जात आहे.
याआधी दारुल उलूमने 'भारत माता की जय' असं म्हणू नये यासाठी फतवा काढला होता. दारुल उलूम या संस्थेने मुस्लिमांनी भारतमाता की जय’ म्हणू नका, असा फतवा काढला होता. ज्याप्रमाणे मुस्लिम समुदाय ’वंदे मातरम’ म्हणू शकत नाहीत त्याचप्रमाणे ’भारतमाता की जय’ ही घोषणादेखील देऊ शकत नाहीत, असे या फतव्यात म्हटले होते.
दारुल उलूम संस्थेने काढलेल्या फतव्यात म्हटले होते, केवळ एक मानवच मानवाला जन्म देऊ शकतो. मग जमीन किंवा भूमी आई कशी होऊ शकते? मुसलमान समुदाय केवळ अल्लातालाची पूजा करू शकतो त्याव्यतिरिक्त कोणाचीही नाही, मग मुस्लिमांनी भारताला देवी का म्हणावे? असा सवाल यात करण्यात आला होता. मुस्लिमांनी या घोषणेपासून स्वतःला दूर करावे, असेही या फतव्यात सांगितले होते. आम्ही देशावर प्रेम करतो, मात्र आम्ही केवळ एकाच ईश्वरावर विश्वास ठेवतो, असे स्पष्टीकरणही याविषयी देवबंदने दिले होते. स्वातंत्र्यदिनी आपल्या कार्यालयांवर सध्या ‘भारत माता की जय’ असा फतवा काढणाऱ्या याच संस्थेने राष्ट्रीय ध्वज फडकाविण्यात यावा असा आदेश काढला होता.