भोपाळ: मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला होता. कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांना नालायक म्हटलं होतं. या टीकेला आता चौहान यांना उत्तर दिलंय. विशेष म्हणजे कमलनाथ यांच्या टीकेला उत्तर देताना शिवराज यांनी डझनभरवेळा नालायक या शब्दाचा वापर केला. राज्यातील गरिब जनतेसाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विविध योजनांची घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी कमलनाथ यांच्या टीकेला उत्तर दिलं. 'होय, आम्ही नालायक आहोत. कारण आम्ही वसाहती वैध ठरवल्या. होय, आम्ही नालायक आहोत. कारण आम्ही अवघ्या एका रुपयात गरिबांना गहू देतो,' अशा शब्दांमध्ये चौहान यांनी कमलनाथ यांना प्रत्युत्तर दिलं. राज्यातील अवैध वसाहती वैध ठरवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर चौहान पत्रकारांशी बोलत होते. कमलनाथ यांच्या टीकेचा चौहान यांनी जोरदार समाचार घेतला. 'आम्ही गरिबांवर उपचार करतो, त्यामुळे आम्ही नालायक झालो. योजना खूप चांगली आहे. मात्र तरीही ते आम्हाला नालायक म्हणताहेत,' असं चौहान यांनी म्हटलं. कमलनाथ यांना चौहान यांच्या सोबतच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला 'काही मित्र लायक असतात, तर काही मित्र नालायक असतात,' असं उत्तर दिलं होतं. कमलनाथ यांनी केलेलं हे विधान सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. कमलनाथ यांच्या टीकेला चौहान यांनी ट्विटरदेखील उत्तर दिलं होतं. यावेळी त्यांनी भाजपचं निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचा उल्लेख करत कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला होता. 'फक्त कमळ महत्त्वाचं आहे. आम्ही सर्वांचा आदर करतो आणि फक्त कमळ हे फूल महत्त्वाचं असल्याचं मानतो,' असं ट्विट चौहान यांनी केलं होतं.
...तर मी नालायक आहे- शिवराजसिंह चौहान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 10:52 AM