नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेतल्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी आज सकाळी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड जारी केले. मोदी सरकार अर्थव्यवस्था, सीमा सुरक्षा, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा या मुद्द्यांवर अपयशी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, या अपयशाला जबाबदार कोण, असा सवालही सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
बुधवारी भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. तेव्हापासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, बैठकीनंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांचे जोरदार कौतुक केले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मी ज्या राजकारण्यांना भेटलो किंवा त्यांच्यासोबत काम केले. यामध्ये ममता बॅनर्जी या मोरारजी देसाई, जेपी, राजीव गांधी, चंद्रशेखर आणि पीव्ही नरसिंह राव यांच्या रँकमधील आहेत. या लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नाही. भारतीय राजकारणातील हा दुर्मीळ गुण आहे.
याचबरोबर, ज्यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी तुम्ही तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की मी आधीच त्यांच्यासोबत आहे. मला पक्षात येण्याची गरज नाही. सुब्रमण्यम स्वामी यांनी याआधीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. मात्र ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर ते उघडपणे निशाणा साधत आहेत. तसेच, एनडीए सरकारच्या दुसऱ्या इनिंगमध्ये कोणतीही मोठी भूमिका न मिळाल्याने नाराज असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी काही काळ सरकारच्या निर्णयांवर उघडपणे टीका करण्यास मागेपुढे पाहिले नाही.
'ममता बॅनर्जी खऱ्या हिंदू'गेल्या वर्षीही बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय लढाई शिगेला पोहोचली होती, तेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांना खऱ्या हिंदू आणि दुर्गा भक्त म्हटले होते.