लाज आणली; भाजपा नेत्याचं महिला पत्रकारांबद्दल गलिच्छ विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 12:08 PM2018-04-20T12:08:25+5:302018-04-20T12:08:25+5:30
भाजपाचे वरिष्ठ नेते एस.व्ही शेखर यांनी गुरूवारी फेसबुक पोस्ट लिहिल महिला पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं.
चेन्नई- एका पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकाराच्या गालाला हात लावल्यामुळे वादात सापडलेले तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी महिला पत्रकाराची माफी मागत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ताजी असतानाच आता भाजपाचे वरिष्ठ नेते एस.व्ही शेखर यांनी गुरूवारी फेसबुक पोस्ट लिहित महिला पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ‘मदुरई युनिव्हर्सिटी, गव्हर्नर अॅण्ड द वर्जिन चिक्स ऑफ ए गर्ल’, असं शीर्षक या पोस्टला त्यांनी दिलं. 'कुणीही महिला मोठ्या व्यक्तीबरोबर झोपल्या शिवाय वृत्त निवेदक किंवा रिपोर्टर बनू शकत नाही', असं शेखर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. भाजपा नेत्याच्या या आक्षेपार्ह पोस्टमुळे चेन्नईतील पत्रकारांनी त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. शेखर यांच्या निषेधार्थ चेन्नईतील पत्रकार शुक्रवारी भाजपा राज्य मुख्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.
शेखर यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, नुकत्याच अनेक तक्रारींमधून कडू सत्य बाहेर आलं आहे. या महिलांनी राज्यपालांवर प्रश्न उपस्थित केले. मीडियातील लोक हे तामिळनाडूतील तुच्छ, नीच आणि असभ्य लोक आहेत. त्यामध्ये काही अपवाद आहे. त्यांची मी इज्जत करतो. त्यांच्याशिवाय तामिळनाडूतील पूर्ण मीडियात आरोपी, ब्लॅकमेलर्सच्या हातात आहे. शेखर यांनी फेसबुक पोस्टचं क्रेडीट ‘थिरूमलाई एस’ नावाच्या व्यक्तीला दिलं आहे.
एस व्ही शेखर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, थिरूमलाई अमेरिकेतील भाजपाचे समर्थक आहेत. ते अमेरिकेला जाण्याआधी मला भेटले होते. नरेंद्र मोदींचे समर्थक असल्याचं थिरूमलाई यांनी सांगितलं. थिरूमलाई यांची पोस्ट शेअर करताना मी ती पूर्ण वाचली नाही. मी कधीच कुणाला शिवीगाळ करणार नाही. मला ती पोस्ट डिलीट करायची होती. व त्याआधी फेसबुकने माझी प्रोफाइल ब्लॉक केली. मी पुढील 24 तास फेसबुक सुरू करू शकत नाही, अशी सारवासारव शेखर यांनी केली आहे.
दरम्यान, शेखर यांच्यावर सोशल मीडियावरून टीका होऊ लागल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 'फेसबुकवरील पोस्ट मी पूर्ण न वाचता शेअर केली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. माझ्या पोस्टमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया शेखर यांनी दिली आहे.
BJP leader S Ve Shekher issues a statement over his derogatory social media post on women, says 'I had posted it without reading the message. It was removed immediately after my friend pointed it out. If I had hurt anyone, it was not on purpose & I extend my heartfelt apology'. pic.twitter.com/FQ0PT5lXnq
— ANI (@ANI) April 20, 2018