Aligarh Child Murder : आरोपींना फाशी द्या, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचं मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 09:46 AM2019-06-11T09:46:56+5:302019-06-11T10:06:49+5:30
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीलं आहे. आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी मालीवाल यांनी केली आहे.
अलीगड - उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दाम्पत्याने 10 हजार रुपयांचे कर्ज थकवल्याने त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने देशभरातून संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीलं आहे. आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी मालीवाल यांनी केली आहे.
'अलीगड प्रकरणातील आरोपींना दोन महिन्यांच्या आतमध्ये शिक्षा सुनावली जावी. जेणेकरून देशात एक मार्मिक संदेश पोहचेल. अपराध संशोधन कायदा 2018 ची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जावी' अशी मागणी दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी टप्पलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ट्विंकल असं या चिमुकलीचं नाव आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून तपासात दिरंगाई केल्यामुळे पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Correction: Delhi Commission for Women Chairperson, Swati Maliwal writes to PM Modi demanding death sentence for the accused in murder* case of a 2.5 year old girl in UP's Aligarh. https://t.co/AUr0ZkYCVq
— ANI (@ANI) June 10, 2019
Aligarh Child Murder : आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, राहुल आणि प्रियंका गांधींची मागणी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय द्या तसेच आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी 'अलीगडमध्ये घडलेली घटना ही अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेमुळे मी विचलित झालो आहे. एखाद्या लहान मुलीची अशाप्रकारे क्रौर्याने हत्या करायला माणसांचे हात कसे काय तयार होतात? ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणी न्याय झालाच पाहिजे' असं ट्वीट केलं आहे. तसेच 'अलीगडमध्ये जी घटना घडली ती अमानवी आणि क्रौर्याचा कळस गाठणारी घटना आहे. त्या मुलीच्या आई वडिलांना आता काय वाटत असेल याचा विचार करायलाही भीती वाटते. जे अपराधी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे' असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या अलीगडमध्ये टप्पल परिसरात एक दाम्पत्य राहते. त्यांची अडीच वर्षाची मुलगी ट्विंकल ही चार दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर गावाबाहेरील कचराकुंडीजवळ तिचा मृतदेह सापडला होता. हत्या करणाऱ्यांनी मुलीचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न देखील केला होता. तसेच मृतदेह कचराकुंडीत फेकल्याने भटके कुत्रे तिच्या मृतदेहाजवळ असलेले काही ग्रामस्थांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याप्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली.
मुलीच्या मृतदेह सापडल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. तसेच गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले. मुलीवर बलात्कार झाला नव्हता, मात्र तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत असून चार जणांना अटक केली तसेच तपासात दिरंगाई केल्यामुळे पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी कर्जासाठी अडीच वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचं सांगितलं. आरोपींचा मुलीच्या आई-वडिलांशी पैशांवरून वाद झाला होता. दाम्पत्याने त्यांच्याकडून दहा हजारांचे कर्ज घेतले होते. मात्र त्या कर्जाची त्यांनी परतफेड केली नसल्याने वाद झाला होता. त्यातूनच आरोपींनी दाम्पत्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली होती. मुलीच्या वडिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.