नवी दिल्ली : प्रशासनाला वारंवार कळवूनही ऑक्सिजन पुरवठा उशिरा झाल्याने मेहरौली येथील बत्रा हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या १२ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. मृतांमध्ये हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरिटिस विभागाचे प्रमुख डॉ. आर. के. हिमथानी (६२) यांचाही समावेश आहे.
या रुग्णालयात ७२७ रुग्ण असून, त्यापैकी ४८ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. शनिवारी दुपारी १२ वाजता वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची पातळी कमी झाल्याचे हाॅस्पिटलच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याची दखल घेतली. त्यानंतर दीड तासाने ऑक्सिजन टँकर दाखल झाला. मात्र, तोपर्यंत या रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर दुसरा टँकर ४ वाजता रुग्णालयात पोहोचला. सुमारे एक तास २० मिनिटे रुग्णालयातील ऑक्सिजनपुरवठा खंडित झाला होता. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी ऑक्सिजनची कमतरता दाखवत झालेल्या दुर्घटनांची नोंद केली. सध्या २२० रुग्ण ऑक्सिजनवर असून, पुढील २४ तास कठीण आहेत. पुरेसा ऑक्सिजनपुरवठा न झाल्यास अधिक जीवितहानी होण्याची भीती हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. सुधांशू बनकाटा यांनी व्यक्त केली.
प्राणवायूअभावी जळगावमध्ये दोघांचा मृत्यूपाचोरा : प्राणवायूअभावी एका युवकासह दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. महेश तानाजी राठोड (३२) आणि जारसीबाई चव्हाण (७५) अशी मृतांची नावे आहेत.
पुन्हा वाढला लॉकडाऊन!
कोरोना संसर्गाची सध्याची स्थिती लक्षात घेता दिल्लीतील लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढविण्यात आला आहे. केजरीवाल यांनी शनिवारी लॉकडाऊन आणखी एका आठवड्याने वाढविण्याची घोषणा केली. नवीन आदेशानंतर १० मे रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत दिल्लीत लॉकडाऊन लागू राहील.
तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीतील लॉकडाऊनचा पहिला आठवडा संपल्यानंतर संक्रमणाचे प्रमाण सुमारे ३७ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. गेल्या एक-दोन दिवसांपासून संक्रमण दर थोडा कमी झाला असून, आज तो ३० टक्क्यांपर्यंत आहे.