नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणातील आरोपी शशी थरुर यांना विदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने शशी थरुर यांचा अर्ज मंजूर केला. याप्रकरणी थरुर यांना विदेशात जाण्यास कोर्टाने बंदी घातली होती. मात्र, थरुर यांनी विदेशात जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने आज हा अर्ज मंजूर केला आहे.
पटियाला हाऊस कोर्टाने यापूर्वी शशी थरुर यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, परदेशवारीला परवानगी नाकारली होती. त्यामुळे थरुर यांनी पुन्हा पटियाला हाऊस कोर्टाकडे विदेशात जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला. त्यावर, आज सुनावणी करताना कोर्टाने थरुर यांचा अर्ज मंजूर केला. थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शशी थरुर यांना आरोपी केले आहे. थरुर यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि पत्नीसोबत क्रूरपणे वागणूक केल्याचा आरोप थरुर यांच्यावर केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात तसा उल्लेखही आहे. दरम्यान, 17 जानेवारी 2014 च्या मध्यरात्री दिल्लीतील लीला हॉटेलच्या रुम नंबर 345 मध्ये सुनंदा पुष्कर यांचा गुढ मृत्यू झाला होता. या रुममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर, सर्वत्र खळबळ उडाल्यामुळे दिल्ली पोलिसांनी घटनेची चौकशी सुरु करुन तब्बल 1 वर्षानंतर खूनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, एम्सच्या अहवालनुसार सुनंदा यांच्या शरीरात कुठल्याही प्रकारचे विष मिळाले नाही. तर याप्रकरणात थरुर यांचीही सखोल चौकशी करण्यात आली आहे.