पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 11:36 AM2017-08-12T11:36:21+5:302017-08-12T11:39:59+5:30

पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Death of a woman in Pakistani army firing | पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात महिलेचा मृत्यू

पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात महिलेचा मृत्यू

Next
ठळक मुद्देपाकिस्तानी लष्कराने स्वयंचलित बंदुका आणि छोटया शस्त्रांचा वापर करुन अंदाधुंद गोळीबार केला.नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

श्रीनगर, दि. 12 - पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पाकिस्तानी लष्कराने  नियंत्रण रेषेवरील भारतीय चौकी आणि सीमावर्ती गावांमध्ये गोळीबार केला. पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने स्वयंचलित बंदुका आणि छोटया शस्त्रांचा वापर करुन अंदाधुंद गोळीबार केला अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिली. 

नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. जवळपास तासभर दोन्ही बाजूंकडून धुमश्चक्री सुरु होती. पाकिस्तानी लष्कराने डागलेल्या मोर्टारचा गोहलाड कालरान गावामध्ये मोहम्मद शाबीर यांच्या घराजवळ स्फोट झाला. त्यामध्ये त्यांची पत्नी राकीया बी यांचा मृत्यू झाला. सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती पोलिस अधिका-याने दिली. 

8 ऑगस्टला पाकिस्तानी लष्कराने पूँछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. त्यामध्ये पवन सिंह सुग्रा (21) हा जवान शहीद झाला होता. यावर्षी 1 ऑगस्टपर्यंत पाकिस्तानी लष्कराने 285 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. 2016 मध्ये ऑगस्टपर्यंत पाकिस्तानने 228 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा लष्करी तळावर गोळीबार, जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर गोळीबार केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. काश्मीर खो-यात सातत्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या कारवाया सुरु असून, यापूर्वी सुद्ध अनेकवेळा दहशतवाद्यांनी लष्करी तळाला लक्ष्य केले आहे. 

रात्रीच्या सुमारास दहशतवाद्यांनी कालारुस येथील लष्करी इमारतीवर गोळीबार केला. यामध्ये जम्मू-काश्मीर लाईट इनफँट्री 17 चे जवान सुनील रंधावा जखमी झाले. त्यांना द्रुगमुल्ला येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गोळीबार करणा-या दहशतवाद्यांनी हुडकून काढण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी या भागात शोधमोहीम सुरु केली आहे. 

दोन दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांकडून तीन दहशतवाद्यांचा बुधवारी  खात्मा करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल सेक्टमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक झाली. यावेळी सुरक्षा रक्षकांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.  
    

Web Title: Death of a woman in Pakistani army firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.