फ्लेक्स फ्युअल इंजिनाच्या निर्णयावर दोन दिवसात स्वाक्षरी, नितीन गडकरी यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 10:24 AM2021-12-01T10:24:30+5:302021-12-01T10:24:55+5:30
इंधनाच्या वाढणाऱ्या किमती आणि प्रदूषणाच्या दृष्टीने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लेक्स इंधनावर आधारित इंजिनावर भर दिला आहे.
नवी दिल्ली : इंधनाच्या वाढणाऱ्या किमती आणि प्रदूषणाच्या दृष्टीने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लेक्स इंधनावर आधारित इंजिनावर भर दिला आहे. आता कार कंपन्यांना फ्लेक्स इंधन इंजिन अनिवार्य करण्यासंबंधी गडकरी लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
फ्लेक्स इंजिनामध्ये एकापेक्षा जास्त इंधनाचा वापर करता येऊ शकताे. पारंपरिक जीवाश्म इंधनावर भारताचे सुमारे ८५ टक्के अवलंबन आहे. दरवर्षी सुमारे ८ लाख काेटी रुपयांचे कच्चे तेल भारत आयात करताे.
या इंधनावर अवलंबन कायम राहिल्यास हा आकडा पुढील काही वर्षांनी २५ लाख काेटी रुपयांवर जाऊ शकताे. त्यामुळे पुढील दाेन-तीन दिवसांमध्ये यासंबंधी एका आदेशावर स्वाक्षरी करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. गडकरी म्हणाले की, हे इंधन प्रदूषण करणार नाही. याचे उत्पादन आपल्या शेतकऱ्यांनी केलेले असेल.
१५-२० दिवसांनी दिसणार एक खास गाडी
नितीन गडकरी यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे काैतुक करताना सांगितले की, १५ ते २० दिवसांमध्ये माझ्याकडे एक खास गाडी दिसेल. ही गाडी ग्रीन हायड्राेजन म्हणजेच पाण्यापासून हायड्राेजन आणि ऑक्सिजनला वेगळे करून चालेल. लाेकांचा विश्वास बसणार नाही. पण, मी प्रत्यक्षात त्या गाडीत बसल्यानंतरच मी सांगताे, त्यावर विश्वास बसेल. वाया जाणाऱ्या पाण्यापासून महापालिका ग्रीन हायड्राेजन इंधन बनवतील आणि देशातील गाड्या त्यावर धावतील.
काय आहे फ्लेक्स फ्युअल?
फ्लेक्स फ्युअल हे पेट्राेल आणि मिथेनाॅल किंवा इथेनाॅल यांच्या संयाेगातून बनविण्यात येते. भारतात पेट्राेलमध्ये ८.५ टक्के इथेनाॅल ब्लेंडिंग करण्यात येते. दाेन वर्षांमध्ये हे प्रमाण २० टक्के करण्यात येणार आहे. म्हणूनच फ्लेक्स फ्युअल इंजिनांची निर्मिती आवश्यक आहे.