नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत रविवारपेक्षा सोमवारी आणखी २,९९२ ने घट झाली आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ५,०९,६७३ असून, एकूण रुग्णसंख्या ८५ लाख ५३ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४८ टक्के आहे. बरे झालेल्यांची संख्या व प्रमाण अनुक्रमे ७९ लाख व ९२.५६ टक्के झाले आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात ८५,५३,६५७ कोरोना रुग्ण असून, त्यातील ७९,१७,३७३ जण बरे झालेआहेत. सोमवारी कोरोनाचे ४५,९०३ नवे रुग्ण आढळले. या संसर्गाने आणखी ४९० जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,२६,६११ झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ५.९६ टक्के आहे.
साडेतीन कोटी कोरोनामुक्त
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ५ कोटी ७ लाख ५२ हजारांहून अधिक आहे. बळींचा आकडा १२ लाख ६२ हजाराहून जास्त असून, ३ कोटी ५८ लाख लोक कोरोनातून बरे झाले. अमेरिकेमध्ये १ कोटी २ लाख ८८ हजार रुग्ण आहेत. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये ५६ लाख ६४ हजार कोरोना रुग्ण आहेत. युरोपमध्ये कोरोना स्थिती आणखी बिघडली आहे. अमेरिकेत रोज सुमारे सव्वालाख नवे रुग्ण आढळत आहेत.