दिल्लीत नवीन रुग्णांच्या संख्येत घट, मृत्युदरही कमी; मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:16 PM2020-07-20T22:16:19+5:302020-07-20T22:16:46+5:30
दिल्लीत दररोज २० हजारांवर तपासण्या होत आहेत. आधी किमान ३ ते ४ हजार रुग्णांची रोज भर पडत असे
- विकास झाडे
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशभरात ४० हजारांवर नवीन रुग्णांची भर पडणे आणि ७०० रुग्णांचा मृत्यू होणे हे धक्कादायक असले तरी दिल्लीतील चित्र मात्र समाधानकारक आहे. इथे नवीन रुग्णांची संख्या तर कमी झालीच, शिवाय रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही बरेच कमी झाले आहे.
दिल्लीत दररोज २० हजारांवर तपासण्या होत आहेत. आधी किमान ३ ते ४ हजार रुग्णांची रोज भर पडत असे. दिवसाला शंभरावर मृत्यूची नोंद होत होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नियोजन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सहकार्याने स्थिती नियंत्रणात आहे. विलगीकरणापासून तर वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आखलेल्या कार्यक्रमाने मोठे यश मिळत आहे.
दिल्लीत सध्या जवळपास एक हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णांच्या मृत्यूचे आकडे एक तृतीयांश झाले आहेत. आज रुग्ण दगावल्याची संख्या ३५ होती. दिल्लीत आतापर्यंत १ लाख २३ हजार ७४७ रुग्णांची नोंद झाली असली तरी त्यातील १ लाख ४ हजार ९१८ रुग्ण बरे झाले आहेत. दररोज सरासरी दोन हजार रुग्ण बरे होत आहेत. रुग्णालयात भरती रुग्णांची संख्या ५८३३ असून, २५ हजार ४८३ खाटांची सोय करण्यात आली आहे.
कन्टेन्मेंट झोन; नियमांचे कठोर पालन
रुग्णसंख्येत घट होण्याचे एक कारण म्हणजे कन्टेन्मेंट झोन आहे. या भागात नियमांचे कठोर पालन करण्यावर दिल्ली सरकारने भर दिला आहे. महिनाभरापूर्वी दिल्लीत केवळ १०० कन्टेन्मेंट झोन होते. किमान चार रुग्ण जिथे आढळतात, त्या भागाला कन्टेन्मेंट झोन घोषित केले जाते. दिल्लीत आज ६९६ कन्टेन्मेंट झोन आहेत.