पचौरींविरुद्ध विनयभंगाचे आरोप निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 04:31 AM2018-10-21T04:31:00+5:302018-10-21T04:31:02+5:30
एका स्थानिक न्यायालयाने टेरीचे माजी प्रमुख आर. के. पचौरी यांच्याविरुद्ध विनयभंगाचे आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्या एका माजी सहकारी महिलेने त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली : येथील एका स्थानिक न्यायालयाने टेरीचे माजी प्रमुख आर. के. पचौरी यांच्याविरुद्ध विनयभंगाचे आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्या एका माजी सहकारी महिलेने त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
दिल्लीचे महानगर दंडाधिकारी चारू गुप्ता यांनी पचौरी यांच्याविरुद्ध विनयभंग करणे, शारीरिक स्पर्श आणि अयोग्य व लैंगिक शेरेबाजी, तसेच छेड व असभ्य इशारे व कृती केल्याबद्दल आरोप निश्चित केले आहेत. एकूण सातपैकी तीनच आरोप नक्की करण्यात आले. या आरोपांबद्दल त्यांच्यावर आता खटला चालविला जाईल. याप्रसंगी पचौरी हे स्वत: न्यायालयात हजर होते. त्यांनी आरोप फेटाळले. पचौरी ७८ वर्षांचे असल्याने सुनावणी लवकर संपवावी, अशी विनंती पचौरी यांच्या वतीने अॅड. आशिष दीक्षित यांनी केली. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी ४ जानेवारी २0१९ रोजी ठेवली.
>आरोपांचा तपशील मिळाला
मार्च २0१७ मध्ये पचौरी यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. पचौरी आणि आरोपकर्ती महिला यांच्यातील ई-मेल, व्हॉटस्अॅप व एसएमएसद्वारे झालेल्या संवादाचा विस्तृत तपशील मिळाल्यामुळे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले होते. मोबाईल, संगणकाची हार्ड डिस्क व अन्य उपकरणांवरून हा तपशील मिळविण्यात आला.