नवी दिल्ली : पंतप्रधाननरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी आपला 72 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. यानिमित्ताने दिल्लीतील एका रेस्टॉरंटने पंतप्रधान मोदींना समर्पित 56 इंचांची खास जेवणाची थाळी तयार केली आहे. कनॉट प्लेस येथे असलेल्या ARDOR 2.1 रेस्टॉरंटने ही किंग साइज थाली तयार केली आहे, ज्यामध्ये 56 खास पदार्थ असणार आहेत. या थाळीमध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीचे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ निवडता येणार आहेत.
वृत्तसंस्था एएनआयच्या रिपोर्टनुसार, दिल्लीच्या ARDOR 2.1 रेस्टॉरंटने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास 56 इंचाची खास थाळी लाँच करण्याची अनोखी कल्पना आणली आहे. या रेस्टॉरंटचे मालक सुमित कालरा यांनी सांगितले की, "मला पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्याबद्दल खूप आदर आहे, म्हणून आम्ही ही भव्य थाळी तयार करण्याचा विचार केला. या थाळीला आम्ही '56 इंच मोदी जी' थाळी असे नाव दिले आहे. आम्ही नरेंद्र मोदींना ही थाळी भेट देऊ इच्छितो. त्यांनी इथे येऊन या थाळीचा आस्वाद घ्यावा अशी आमची इच्छा आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही हे करू शकत नाही. त्यामुळे ही थाळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांसाठी आहे."
रेस्टॉरंटला भेट देणारे ग्राहक या खास थालीद्वारे बक्षिसेही जिंकू शकतात. याबाबत सुमित कालरा म्हणाले की, "आम्ही या थाळीसोबत काही खास बक्षीस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जर कपलमधील कोणत्याही व्यक्तीने 40 मिनिटांत ही थाळी संपवली तर आम्ही त्याला साडेआठ लाख रुपयांचे बक्षीस देऊ. तसेच, 17 ते 26 सप्टेंबर दरम्यान रेस्टॉरंटमध्ये येऊन '56 इंच मोदी जी' थाळीचा आस्वाद घेणारा भाग्यवान विजेता किंवा कपल, यांना केदारनाथला भेट देण्याची संधी मिळेल, कारण केदारनाथ हे पंतप्रधान मोदींच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे."
दरम्यान, पंतप्रधान मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचा हा दिवसही नेहमीप्रमाणे खूप व्यस्त असणार आहे. 17 सप्टेंबर रोजीच नामिबियातून आठ चित्ते भारतात आणले जात आहेत. त्यांना विशेष चार्टर विमानाने ग्वाल्हेरला आणले जात आहे. पंतप्रधान मोदी आपल्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना उद्यानात बांधलेल्या खास जागेत सोडणार आहेत. दरम्यान, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उझबेकिस्तानमधील समरकंद येथे आहेत.