दिल्ली बनली ‘गॅस चेंबर’!, रविवारपर्यंत शाळांना सुटी; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 02:55 AM2017-11-09T02:55:07+5:302017-11-09T02:55:42+5:30
प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून सरकार रस्त्यावर पाणी शिंपडणे, व्हॅक्युम क्लिनिंगचा प्रयोग करणे, चार चाकी वाहनांचा वापर कमी करणे तसेच दिल्लीत कचरा जाळण्यास बंदीबाबत विचार करीत आहे.
विकास झाडे/ टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : दिल्लीत घेतला जाणारा प्रत्येक श्वास विषारी झाला असून, राजधानीची स्थिती गॅस चेंबरसारखी झाली आहे. खुल्या हवेत श्वास घेणेही कठीण झाले असून, लोक मास्क लावून बाहेर पडत आहेत. प्रदूषित हवेमुळे
शाळकरी विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाल्याने उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. घनटाद धुक्यामुळे पंजाब, हरयाणा व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात झालेल्या अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वसाधारण हवेच्या तुलनेत २० पट घनदाट आणि प्रदूषणाचे मिश्रण असलेला स्मॉग दिल्लीत पसरलेला आहे. यामुळे दिवसा दृश्यमानता कमी झाली होती. स्मॉगमध्ये फिरताना अनेकांच्या डोळ्यांची जळजळ होत होती. अनेकांना श्वसनाचे, खोकल्याचे विकार होत आहेत. डोळ्यांमध्ये आग होणे, अंगाला खाज सुटण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गतवर्षीेच्या तुलनेत यंदा प्रदूषण जास्त आहे. त्यामुळे सकाळी कामाशिवाय बाहेर पडणे, फिरायला जाणे तसेच मैदानावर खेळण्याचे टाळा, असे आवाहन सिसोदिया यांनी केले.
स्थानिकांसाठी सरकारने मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. अस्थमा, दम्याचा विकार असलेले वृद्ध, शाळकरी मुले-मुली घरातच बसून आहेत. प्रदूषणामुळे अस्थमा, दमा, फुप्फुस्सांचे विकार, डोळ्यांची जळजळ तसेच मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. स्थिती कायम राहिल्यास वाहतुकीसाठी सम-विषम नियमाची अंमलबजावणी करण्याचे संकेत सिसोदिया यांनी दिले. वाहनतळाचे शुल्क चार पट वाढविण्याचे आदेश दिले आहेत.
समोरचे काहीच दिसेना झाल्याने
२० वाहने एकमेकांवर आदळली
स्मॉगमुळे पंजाब, हरियाणा व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात झालेल्या अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये चालकाच्या शून्य दृश्यमानतेमुळे पुलावर उभ्या असलेल्या सात शाळकरी विद्यार्थ्यांना ट्रक धडकला. ज्यात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यमुना एक्स्प्रेस-वेवर एकापाठोपाठ २० वाहने एकमेकांवर आदळली. ज्यामुळे वाहतूककोंडी झाली.
उपाय काय?
प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून सरकार रस्त्यावर पाणी शिंपडणे, व्हॅक्युम क्लिनिंगचा प्रयोग करणे, चार चाकी वाहनांचा वापर कमी करणे तसेच दिल्लीत कचरा जाळण्यास बंदीबाबत विचार करीत आहे.
हरित लवादाने घेतले फैलावर
राष्टÑीय हरित लवादाने प्रदूषण वाढणार असल्याची माहिती असतानादेखील उपाययोजना का केली नाही, असा सवाल करीत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब या राज्यांच्या प्रशासनाला फैलावर घेतले आहे. पुढील दोन दिवसांत यासंबंधी उपाययोजना करण्याचे निर्देश लवादाने संबंधित राज्यांना दिले आहेत.
गडकरी सरसावले!
जड वाहनांमुळे होणारे प्रदूषण ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी २७० किमीच्या रिंग रोडचे ८५ टक्के काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. त्यामुळे जड वाहनांना शहरात येण्याची गरज राहणार नाही. दिल्लीच्या सर्व दिशांना व्यापणाºया २७० किमी अंतराचा पूर्व आणि पश्चिम परिघाकृती एक्स्प्रेस-वेचे डिसेंबरमध्ये लोकार्पण करण्यात येईल. हा मार्ग वाहतुकीस खुला झाल्यास उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेशमध्ये जाणारी वाहने नव्या मार्गाने दिल्लीबाहेरून जातील. या मार्गामुळे ५० टक्के प्रदूषण कमी होईल, असा विश्वास गडकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
दिल्लीत
स्मॉग का?
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीचे आवाहन केले आहे. दोन्ही राज्यांतील शेतकरी शेतातील तण जाळतात, त्या धुरामुळे प्रदूषणात वाढ होते.
प्रदूषणाचा सामना करण्यासाठी या तीनही राज्यांमध्ये समन्वय महत्त्वाचा आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारचीही मदत आवश्यक आहे.