नवी दिल्ली : निजामुद्दीन येथील मरकजमधून निघाल्यानंतर फरार झालेल्या तबलिगी जमातच्या नागरिकांविरोधात आता दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. परदेशातून आलेल्या तब्बल 1890 जमाती मंडळींवर ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून आलेले जमातचे लोक व्हिसा नियमांचे उल्लंघन करून धार्मिक कार्यात सहभागी झाले होते. ते सापडल्यानंतर त्यांचा व्हिसा रद्द करण्यात येत आहेत. तसेच परदेशातून आलेल्या जमातमधील इतर लोकांचीही भूमिका तपासण्यात येत आहे.
दिल्ली पोलिसांचे गुन्हे शाखा पथक लोकेशनच्या आधारे छापेमारी करत आहे. एवढेच नाही, तर तबलिगी जमातच्या 18 जणांना तपासात सहभागी होण्यासाठीही नोटीस बजावण्यात आली आहे. यापैकी 11 जण क्वारंटाईन आहेत. जे तबलिगी टूरिस्ट व्हिसा घेऊन भारतात आले आणि तबलिगी जमातमध्ये सहभागी झाले होते, अशा तब्बल 960 परदेशी नागरिकांना केंद्र सरकारने ब्लॅकलिस्ट केले आहे. तसेच सर्व राज्यसरकारांनाही, अशा मंडळींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
'...तर त्यांचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही' -तबलिगी जमातीचे जे लोक दिल्लीच्या मरकजहून परतले त्यांच्यापैकी महाराष्ट्रात परतलेल्या १,३५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी १३०० जणांच्या आवश्यक चाचण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वा त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जे लोक स्वत:हून हजर होणार नाहीत, त्यांचा आम्ही शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असे गृहमंत्री आनिल देशमुख यांनी गेल्या आठवड्यात लोकमतशी बोलताना म्हटले होते.