नवी दिल्ली : दिल्ली व राजधानी परिक्षेत्रात फटाके उडविण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही. आम्ही ९ आॅक्टोबरच्या आदेशाने केवळ फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे, फटाके उडवण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. फटाके उडविण्यावर बंदी घातल्याचे कोण म्हणाले? सध्या हाताशी असलेल्या फटाक्यांचा साठा पुरेसा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. के. सिकरी यांच्या या विधानांमुळे या वर्षी दिल्लीत दिवाळी फटाक्यांनी साजरी करता येईल, हे स्पष्ट झाले आहे. त्यावर फटाके उडविण्यासाठी वेळ आणि दिवस निश्चित करावा, असे वरिष्ठ वकील मुकुल रोहटगी यांनी न्यायालयाला सुचविले. त्याचा उल्लेख करीत न्या. सिकरी म्हणाले की, फटाक्यांच्या विक्रीवरील बंदीने दिवाळीच्या सणाचा हिरमोड झाला असेल, असे आपणास वाटत नाही.मात्र, दिल्ली व राजधानी परिक्षेत्रामध्ये १ नोव्हेंबरपर्यंत फटाके विक्रीला बंदी घालणाºया ९ आॅक्टोबरच्या आदेशात बदल करण्यास न्यायालायने नकार दिला. काही लोक न्यायालयाच्या आदेशाला धार्मिक वादाचा रंग देत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे, परंतु लोक आमच्या आदेशावर व्यथा व्यक्त करत आहेत, असा आम्ही त्याचा अर्थ लावतो, असे नमूद करीत आमची मुख्य काळजी ही लोकांच्या आरोग्याची होती, असे न्यायालयाने स्पष्ट केले..मी अध्यात्मिक आहे, परंतु इथे प्रश्न कायद्याचा आहे, असे न्या. सिकरी म्हणाले. न्यायालयाच्या खंडपीठात न्या. अशोक भूषण यांचाही समावेश आहे. खंडपीठासमोर ९ आॅक्टोबरच्या बंदी आदेशाचा फटका बसलेले फटाके निर्माते आणि व्यापाºयांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती.मुले दिवाळीची वाट पाहात आहेत-शेकडो वर्षांपासून दिवाळी साजरी होत आहे. भारतासाठी दिल्ली ही काही अपवाद नाही. दिवाळी साजरी करण्यासाठी मुले वाटत बघत आहेत, असे वरिष्ठ वकील मुकुल रोहटगी यांनी व्यापाºयांच्या वतीने सांगितले.
दिल्लीत फटाके वाजवण्यावर बंदी नाही पण विक्रीवरील निर्बंध कायम: सर्वोच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:18 AM