नवी दिल्ली - दिल्लीची सत्ता पुन्हा राखण्यासाठी कंबर कसलेल्या आम आदमी पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यामधून आपने पुढील पाच वर्षांसाठीचा कार्यक्रम जनतेसमोर मांडला आहे. यामध्ये दिल्लीत जनलोकपाल आणि स्वराज बिल लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबरोबरच शाळेत देशभक्तीपर अभ्यासक्रमही लागू करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे. तसेच या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिल्लीता आधुनिक दिल्ली बनवण्यासाठी काम करू, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने- दिल्लीतील प्रत्येक मुलाला शालेय शिक्षणाची हमी - दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला निरोगी आरोग्याची हमी - दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी शुद्ध पाण्याची हमी - प्रत्येक घरापर्यंत 24 तास पिण्याचे पाणी पोहोचवण्याची हमी - प्रत्येक ग्राहकाला 24 तास आणि 200 यूनिटपर्यंत मोफत विजेची हमी- प्रदूषणाची पातळी कमी करण्याची हमी - यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करणार - महिला सुरक्षेसाठी दिल्लीमध्ये सीसीटीव्ही, स्ट्रीट लाइट आणि महिला मार्शलची नियुक्ती करणार - कच्च्या वस्त्यांचे पक्के बांधकाम करण्याची हमी याशिवाय दिल्लीतील काही भागात काही बाजार प्रायोगिक तत्त्वावर 24 तास उघडे ठेवण्यात येतील. दिल्लीता आर्थिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिले.