नवी दिल्ली : सीएए, एनआरसीवरून राजधानी दिल्ली गेल्या महिनाभरापासून तापलेली असतानाच पुन्हा केजरीवालच मुसंडी मारणार असल्याचा खुद्द भाजपाचाच सर्व्हे आला होता. यामुळे दिल्लीतील नेत्यांची हवाच निघून गेली होती. दिल्लीमध्ये देशभरातील भाजपा नेते, प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्र्यांना पाचारण करण्यात आले होते. तर सोडून गेलेल्या मित्रपक्षालाही पुन्हा सोबत घेतले होते. हे प्रयत्न कुठेतरी फलदयी ठरत असल्याचे भाजपाच्या दुसऱ्या अंतर्गत सर्व्हेमध्ये दिसत आहे.
दिल्लीमध्ये आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मतदारांनी पहिली पसंती दिली होती. यामुळे 70 पैकी 65 तरी जागा आपला मिळतील असा भाजपाचाच निवडणूक जाहीर होण्याआधी सर्व्हे आला होता. यामुळे पहिल्यापासून गृहमंत्री अमित शहा दिल्लीमध्ये प्रचाराला उतरले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जोर लावला आहे. मोदींच्या सभांमुळे वातावरण बदलत असल्याचे सर्व्हेतील आकडेवारीवरून दिसून येत आहे. भाजपाचा अंतर्गत सर्व्हे पूर्व दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या मोदी य़ांच्या सभेनंतर तेथील सर्व मतदारसंघांमध्ये करण्यात आला. या सर्व्हेमध्ये समोर आले आहे की, शाहीन बाग, सर्जिकल स्ट्राईक, बाटला हाऊस आदी मुद्द्यांवर मोदींनी ज्या प्रकारे बाजू मांडली आहे त्याचा फरक दिसू लागला आहे, असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.
भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांच्या रॅलीपूर्वी जेवढे सर्व्हे झाले त्यामध्ये भाजपा दिल्लीमध्ये आपला टक्कर देताना दिसत आहे. मात्र, निकाल आपच्याच बाजुने दिसत होते. आता योगी आदित्यनाथ आणि मोदी यांच्या सभांमुळे निकाल भाजपाच्या बाजुने लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खास बाब म्हणजे काही जागांवर काँग्रेस बाजी मारणार असल्याचेही समोर येत आहे.
सोमवारी सायंकाळी केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाला 70 पैकी 27 जागा मिळताना दिसत आहेत. तर आपला 26, काँग्रेसला 8 ते 9 जागा मिळत असल्याचे आकडे आहेत. तर उरलेल्या जागांवर अटीतटीची लढत होणार आहे. मंगळवारीही मोदींना दिल्लीमध्ये सभा घेतली. यानंतर हे आकडे बदलण्याची शक्यता भाजपाने वर्तविली आहे.