नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते महाबल मिश्रा यांचे पुत्र विनय मिश्रा आणि बदरपूरचे माजी आमदार राम सिंह नेताजी यांनी आम आदमी पार्टीत (आप) प्रवेश केला आहे.
आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत विनय मिश्रा आणि राम सिंह नेताजी यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. याआधी काँग्रेसमध्ये असलेले शोएब इक्बाल आणि त्याचे पुत्र आले इक्बाल हे सुद्धा आम आदमी पार्टीत सामील झाले आहे.
आम आदमी पार्टीने राजकीय समीकरणे बदलली आहे. पार्टीने पूर्वांचलमधील लोकांसाठी चांगले काम केले आहे, असे आम आदमी पार्टीत प्रवेश केल्यानंतर विनय मिश्रा यांनी सांगितले. याशिवाय, यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा साधला. आम आदमी पार्टीने दिल्लीतील भाजपा आणि काँग्रेस जवळपास संपवली आहे. या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसचे लोक आम आदमी पार्टीला मतदान करतील, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
दरम्यान, 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. 2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता.
आणखी बातम्या...(दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप राबविणार 'महाराष्ट्र पॅटर्न')(दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 8 फेब्रुवारीला मतदान, तर 11 रोजी मतमोजणी)(भाजपाला केजरीवालांची भीती का वाटते?, मनीष सिसोदियांनी सांगितलं कारण...)(...तर लवकरच भारत भाजपामुक्त होईल; बड्या नेत्याकडून भाजपाला घरचा आहेर)(जेएनयू दोन वर्षे बंद ठेवून तिथे ''स्वच्छता अभियान'' राबवा, सुब्रह्मण्यम स्वामींचा सल्ला)