नवी दिल्ली : भाजपचे नेते अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, परवेश वर्मा व अभय वर्मा या भाजप नेत्यांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्यांबद्दल गुन्हे नोंदवण्यासंबंधी पोलीस आयुक्तांनी विवेकाने निर्णय घ्यावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिले.एवढी गंभीर प्रक्षोभक भाषणे जाहीरपणे केली जाऊनही गुन्हे नोंदविले न जाण्यावर न्यायालयाने व्यक्त केलेली तीव्र नाराजी, न्यायालयात आलेल्या विशेष पोलीस आयुक्त प्रवीण रंजन यांनी आयुक्तांना कळवावी, असेही खंडपीठाने सांगितले.हा आदेश देताना न्या. एस. मुरलीधर व न्या. तलवंत सिंग यांच्या खंडपीठाने नमूद केले की, कायद्याहून कोणीही श्रेष्ठ नाही. गुन्हे न नोंदविण्याचे काय परिणाम होतील, याचा आयुक्तांनी गांभीर्याने विचार करावा व ललिता कुमारी प्रकरणात ठरवून दिलेल्या मार्गदर्शिकेचे पालन करावे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावावेच लागेल. काहीही झाले, तरी दिल्लीत १९८४ची पुनरावृत्ती होऊ दिली जात नाही, असेही खंडपीठाने बजावले. पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात, हे पाहून गुरुवारी पुढील सुनावणी होईल.हर्ष मंदेर यांच्या याचिकेवर हे निर्देश दिले. ही वक्तव्ये करणारे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत, म्हणूनच पोलीस काही करत नाहीत, असा आरोप याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी केला.प्रक्षोभक वक्तव्यांचे व्हिडीओही न्यायालयाने पाहिले. सॉलिलिटर जनरल तुषार मेहता यांनीही परिस्थिती गंभीर असल्याची कबुली दिली, पण न्यायालयाने विपरित आदेश दिल्यास पोलिसांचे मनोबल खच्ची होईल. तपास करून योग्य वेळी गुन्हे नोंदविले जातील, असे त्यांचे म्हणणे होते. यावर, अशा वेळी तातडीने पावले उचलणे गरजेचे असते. पोलीस कसली वाट पाहत आहेत? असे न्या.मुरलीधर यांनी विचारले.
प्रक्षोभक वक्त्यांवर गुन्हे नोंदवण्याचा निर्णय घ्या; व्हिडीओंबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 5:27 AM