सैनिकांचा अपमान करणाऱ्या दिल्लीतील अधिकाऱ्याला हटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:45 AM2020-02-20T03:45:39+5:302020-02-20T03:46:18+5:30
नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात बुधवारी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सैनिकांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी दिल्लीतील महाराष्ट्र सदनचे सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांना पदमुक्त करण्यात आले आहे. राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश दिले होते.
नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात बुधवारी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सैन्य दलाच्या गोरखा रेजीमेंटचे बँड पथक शिवरायांना मानवंदना देण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर या पथकातील जवान महाराष्ट्र सदनाच्या उपहारगृहातील एक्झीक्युटीव्ह डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी सदनाचे सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना तिथे बसण्यास विरोध केला. जवानांनी बाहेरच्या सार्वजनिक डायनिंग हॉलमध्ये जावे असे सांगत त्यांच्याशी वाद घातला. यावर उपस्थित शिवभक्तांनी आक्षेप घेत जवानांसह महाराष्ट्र सदन सोडले. सैनिकांसोबतच्या या दुर्व्यवहाराची माहिती मिळताच राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्याकडून माहिती घेत संबंधीत सहायक निवासी आयुक्तांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांनी कायरकर यांना सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) पदावरुन कार्यमुक्त केले.