दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नजर कैद केल्याचा 'आप'चा आरोप दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. दिल्लीच्या उत्तर जिल्हा पोलीस उपायुक्तांनी मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवास स्थानाबाहेरील फोटो ट्विट करुन नजरकैद केल्याचा दावा फोल ठरवला आहे.
आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला होता. "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून आल्यानंतर भाजपच्या पोलिसांनी केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवलं आहे. कुणालाही त्यांच्या घरात जाण्याची किंवा बाहेर येण्याची परवानगी नाही", असं ट्विट 'आप'ने केलं आहे.
'आप'च्या या ट्विटवर दिल्ली पोलीस उपायुक्तांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी नजरकैद केल्याचा दावा खोटा आहे. कायद्यानुसार त्यांना मिळालेल्या सर्व अधिकारांचा ते कोणत्याही अडथळ्याविना वापर करत आहेत. त्यांच्या घराबाहेरील परिस्थितीचं हे चित्र सारंकाही सांगून जातं", असं ट्विट दिल्ली पोलीस उपायुक्तांनी केलं आहे.