ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - दिवसाढवळ्या २२.५ कोटी रुपये असलेली एटीएम व्हॅन घेऊन पळालेल्या ड्रायव्हरला पोलिसांनी अखेर शुक्रवारी अटक केली आहे. प्रदीप शुक्ला (३५) असे या आरोपीचे नाव असून काल संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास त्याने गोविंदपुरा भागातून एटीएम व्हॅन पळवली होती. अखेर पोलिसांनी आज सकाळी त्याला अटक केली असून चोरीची २२ कोटी रुपयांची रक्कमही जप्त केली.
दिल्लीतील गोविंदपुरा भागात काल झालेला हा धक्कादायक प्रकार म्हणजे उत्तर भारतातील आजपर्यंतची सर्वात मोठी चोरी मानली जात आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या २४ तासांच्या आतच चोराला रकमेसह पकडून दाखवले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी शुक्ला व सुरक्षा चालक विनय पटेल हे अॅक्सिस बँकेच्या ब्रांचमधून पैसे घेऊन व्हॅनमधून निघाले असता थोड्या अंतरावर सुरक्षा चालकाने फ्रेश होण्यासाठी म्हमऊन शुक्लाला गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र सुरक्षा रक्षक गाडीतून उतरताच शुक्लाने पैशांनी भरलेली गाडी घेऊन पळ काढला. पटेलने या घटनेची माहिती लगेच सुरक्षा एजन्सीचा मालकाला कळवली. त्यानंतर त्यांनी शुक्लाच्या मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न केला असता तो स्विच्ड ऑफ लागला. सुरक्षा एजन्सीच्या मालकाने या घटनेची तक्रार पोलिसांत नोंदवली असता पोलिसांनी कसून शोध घेत अवघ्या २४ तांसाच्या आ शुक्लाला ओखला भागतून पैशांसह अटक केली.