नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतशेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचारासंदर्भात भाजप आणि काँग्रेसने प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासंदर्भा बोलताना, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी लाल किल्ला अपवित्र केला, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे. तर, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी 'दुर्योधना'चा उल्लेख करत नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
काय आली भाजपची प्रतिक्रिया...?भाजप नेते शाहनवाज हुसैन म्हणाले, ''जी शंका होती, ते खरे ठरले. शेतकरी संघटना मोठ-मोठ्या गप्पा मारत होत्या, की शिस्त राखली जाईल. आम्ही आनंदोत्सवात सहभागी होत आहोत. हा आनंदोत्सव होता, की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतावर हल्ला होता? यांनी लाल किल्ला अपवित्र केला आहे. यासंर्वांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी.'' एवढेच नाही, तर ''भडकावण्याचे काम तर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले. शेतकरी संघटनेचे नेते केवळ भडकावण्याचेच काम करत होते आणि आता घटना घडून गेल्यानंतर ते आपले ज्ञान पाझळत आहेत,'' असेही शाहनवाज हुसैन म्हणाले.
काँग्रेसची प्रतिक्रिया -काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी महाभारताचा उल्लेख करत म्हणाले आहे, ''महात्मा विदूर यांच्या सारखे मंत्री, कृपाचार्यांसारखे राजगुरू, द्रोणाचार्यांसारखे महारथी आणि भीष्मांसारखे "मार्गदर्शक" असतानाही हस्तिनापूरचा सर्वनाश कसा झाला? कारण दुर्योधनाच्या अहंकारापुढे सर्व मौन राहिले आणि या मौनाची "किंमत" सर्वांनाच चुकवावी लागली. वाटले, आठवन करून द्यावी. #Farmer''
सरकारने या हिंसाचाराला गांभीर्याने घ्यावे - मायावतीयासंदर्भात, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या, ''देशाच्या राजधानीत काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जे काही घडले, ते कदापी व्हायला नको होते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्रातील सरकारनेही हे गांभीर्याने घ्यायला हवे. याच बरोबर, बसपा केंद्र सरकारला पुन्हा विनंती करते, की त्यांनी हे तीनही कृषी कायदे विलंब न करता परत घ्यावेत आणि शेतकऱ्यांचे आंदोलन संपवावे, जेनेकरून पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये.''
दिल्ली हिंसाचारात 300 पोलीस कर्मचारी जखमी -राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनप्रसंगी शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर पोलिसांनी 22 एफआयआर नोंदवल्या आहेत. हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांचा तपास क्राइम ब्रांच, स्पेशल सेलकडे सोपविण्यात आला आहे.