दिल्लीतील बदरपूर उड्डाणपुलावर शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने सांगितलं की, फरिदाबादहून येणारी कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली आणि दुसऱ्या बाजूला पडली. त्याचवेळी तिची ट्रकशी धडक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 1.45 च्या सुमारास डीडी क्रमांक 4 द्वारे बदरपूर पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये फोन करणाऱ्याने माहिती दिली की, होंडा शोरुमजवळील बदरपूर उड्डाणपुलावर कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या टीमच्या प्राथमिक तपासात फरिदाबादहून परतणाऱ्या कारमध्ये सात जण होते, जे दिल्लीतील एका लग्न समारंभातून घरी परतत होते.
लग्नाहून परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. बदरपूर उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी वाहनावरील नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकून गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकला कार धडकली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे 21 वर्षीय राज, 38 वर्षीय संजू आणि 22 वर्षीय दिनेश अशी आहेत. तर नीरज, अजित, विशाल, अन्सुल अशी अन्य चार जखमींची नावे आहेत. ज्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.