मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक हनी बाबू यांच्या एनआयए कोठडीत विशेष न्यायालयाने ७ आॅगस्टपर्यंत वाढ केली. आरोपीचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा आरोप तपास यंत्रणेने केला. मंगळवारी एनआयएने न्यायालयाला सांगितले की, हनी बाबू यांच्या ई-मेल अकाउंटवर १.२६ लाख मेल आहेत. त्यांची छाननी करायची आहे. त्यांचे अन्य सहकारी, संशयित यांच्या मेलबरोबर हनी बाबू यांच्या मेलची छाननी करायची आहे, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले.
हनी बाबू आणि अटकेत असलेल्या अन्य आरोपींनी माओवाद्यांसाठी निधी जमा केला. उर्वरित तपास सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासावरून हे निष्पन्न झाले की, अनेक गटांत वैर निर्माण करण्याचा कट हनी बाबू यांनी रचला. त्यामुळे दंगल उसळली, काहींचा मृत्यू झाला आणि राज्यभर निदर्शने करण्यात आली, असे एनआयच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.एनआयएचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालयाने हनी बाबू यांच्या एनआयए कोठडीत आणखी तीन दिवस वाढ केली. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुणे येथे कबीर कला मंचाने आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे करण्यात आली. परिणामी दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल उसळली.