नवी दिल्ली - सीएए कायद्यावरुन दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्याने हिंसक आंदोलन पेटलं, जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेने अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. गाड्या जाळल्या, घरं जळाली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना घरं सोडावी लागली.
या दिल्लीतल्या दहशतीच्या वातावरणात तेथील लोक जगत आहेत. हळूहळू या हिंसक आंदोलनानंतर नवभारत टाइम्सने केलेल्या ग्राऊंड रिपोर्टवरुन भयानक वास्तव समोर येत आहे. दयालपूर भागात एका १८-१९ वर्षीय मुलगा त्याच्याच वयाच्या मुलाला खांद्यावर घेऊन रस्त्याने धावत होता. अरे भाऊ, कोणीतरी हॉस्पिटलला सोडा, खूप रक्त सांडलंय, कपडे रक्ताने भरलेत. तो मरेल कोणीतरी मदत करा हे शब्द त्या घटनेची विदारक स्थिती समोर आणणारे होतं. रात्रीचे ११ वाजले होते. रस्त्यावर पोलीस आणि रॅपिड एक्शन फोर्सशिवाय कोणीही नजरेला येत नव्हतं. दयालपूर भागात अनेक घरं जाळली गेली, गाड्या जाळल्या, संपूर्ण बाजारपेठ जळाली होती.
रात्रीच्या वेळेला या हिंदी दैनिकाचे पत्रकार ८ किमी चालले, यावेळी संतप्त लोकांनी अनेकदा त्यांचे आयडी कार्ड तपासली. सीलमपूर भागातही हीच परिस्थिती होती. सहसा या भागात इतकी वाहतूक कोंडी असते त्यातून बाहेर पडण्यासाठी १५-२० मिनिटे लागतात, पण आता या मार्गावर बॅरिकेट्समुळे एक रस्ता बंद आहे. पोलीस तैनात आहे. त्याठिकाणाहून पुढे जाफराबादच्या दिशेने जाताना पोलीस वाहनांचे सायरन्स मोठ्याने ऐकू येत होते. दूरदूरपर्यंत कोणीही दिसत नव्हते, दुकानं बंद होती. जाफराबादमध्ये आंदोलन सुरु होतं. महिला आंदोलनस्थळी बसलेल्या, मात्र सगळं शांत होतं. सीएएविरोधात या महिल्या आंदोलन करत होत्या. याठिकाणी आंदोलक महिला स्वत: सुरक्षा रक्षक बनल्या होत्या. चेक केल्यानंतर महिलांना प्रवेश दिला जात होता. पोलीस याठिकाणी नव्हती. जेथे पोलीस जात आहे त्याठिकाणी हिंसा वाढतेय, याठिकाणी पोलीस नाही ते बरं आहे असं तेथीर रियाज अहमद यांनी सांगितले.
आंदोलक महिला फरहाना म्हणाली की, आम्हाला भीती वाटत नाही, म्हणूनच आम्ही बसलो आहोत. आम्ही गोळी खायला बसलो आहोत. आम्हाला मारुन टाका, पोलीस याठिकाणी आली आम्हाला आंदोलन गुंडाळा असं सांगितले. पण आम्ही म्हटलं की इथे ४१ दिवसांपासून बसलो आहे. आता तेव्हाच उठू जेव्हा सीएए मागे घ्याल. हे जे घडलं ते कपिल मिश्राने घडवलं आहे. आम्ही 23 फेब्रुवारीला मेणबत्ती मोर्चात गेलो होतो. तेथे भीमा आर्मीही होती, पण कपिल मिश्रा यांनी लोकांना भडकवून आमच्या विरुद्ध रस्त्यावर बसवले. आमची लढाई कायद्याची आहे. लोकांची नाही. आम्ही आमच्या मुलांसाठी दहशत आणि अन्यायापासून स्वातंत्र्य मागतोय. पण आम्ही देशद्रोही असल्यासारखं दाखवलं जात आहे. याठिकाणी बाईकवरुन काही जण येतात, शिवीगाळ करतात, धमकी देतात असंही तिने सांगितले.