नवी दिल्ली - दिल्लीतील सीएए विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या आंदोलनात पुन्हा एकदा दगडफेक करण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील काही भागांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात सोमवारी तब्बल 37 पोलीस गंभीर जखमी झाले होते. तर पाच जणांचा मृत्यू झाला होता. मात्र मंगळवारी मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्ली हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो साप पाळला आहे, तो त्यांना डसणार' असं म्हणतं ओवेसींनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. हैद्राबादमध्ये सीएए-एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात एका बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 'दिल्लीतील हा हिंसाचार एका माजी आमदारामुळे होत आहे. आता यामध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचेही पुरावे आता समोर आले आहेत. त्या माजी आमदारांना त्वरित अटक केली पाहिजे आणि लवकरात लवकर हिंसाचार थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असं न झाल्यास या हिंसाचाराची व्याप्ती वाढेल' असं ओवेसींनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत हिंसाचार रोखण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू, असे सांगितले.
अमित शहा आणि अरविंद केजरीवाल यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये द्वेष पसरवणारे संदेश, पोलीस आणि आमदारांमधील समन्वय, सुरक्षा बलांची तैनाती आणि अफवांना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर मुख्यत्वेकरून चर्चा झाली. अमित शहा यांच्यासोबतची बैठक आटोपल्यावर केजरीवाल म्हणाले की, ''दिल्लीत उसळलेला हिंसाचार थांबावा असेच सर्वांना वाटते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यासंदर्भात आज बोलावलेली बैठकही सकारात्मक झाली आहे. हा दिल्लीचा प्रश्न आहे आणि सर्वपक्षीय मिळून त्यासाठी प्रयत्न करू.''
महत्त्वाच्या बातम्या
Donald Trump Visit Live: भारत अमेरिकेतील संरक्षण करारावर शिक्तामोर्तब, ट्रम्प आणि मोदींची घोषणा
धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...
Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर
Delhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान?; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग...
दंगेखोरांनी छातीवर रोखली पिस्तूल, तरीही मागे हटला नाही पोलीस कॉन्स्टेबल