नवी दिल्ली - सीएए विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा हिंसक वळण लागलं आहे. सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले. यामध्ये आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची नुकसान भरपाईची देण्याची घोषणा केली आहे.
दिल्ली हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती ही चिंताजनक असल्याने मृताची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंसाचारातील जखमींसाठी कोणत्याही खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती देखील केजरीवालांनी दिली आहे. गुरुवारी (27 फेब्रुवारी) अरविंद केजरीवाल यांनी एक पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.
दिल्ली सरकारच्या ‘फरिश्ते’ योजनेंतर्गत जखमींना कोणत्याही खासगी रुग्णालयामध्ये मोफत उपचार घेता येतील. एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. हिंसाचारात ज्यांच्या मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख, गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना 2 लाख तर ज्यांची घरे अथवा दुकाने जळाली आहेत त्यांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतील हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला.
बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी दिल्ली हिंसाचारावर भाष्य केलं आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय पक्ष घाणेरडं राजकारण खेळत असल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक सल्ला देखील दिला आहे. 'दिल्लीतील हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण खेळलं जात आहे. केंद्राने कोणताही हस्तक्षेप न करता पोलीस व यंत्रणेस स्वतंत्ररित्या काम करू दिलं पाहिजे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी देखील अन्य राज्यांमध्ये राजकारण करण्यापेक्षा, दिल्लीतील परिस्थिती सर्वसामान्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे' असं मायावती यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत उसळलेला हिंसाचार आणि दंगल रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील दंगलीवरून बुधवारी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने काँग्रेसकडून एक निवेदन राष्ट्रपतींना दिले. दिल्ली दंगलीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई व्हावी, तसेच दंगलीतील पीडितांना मदत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनामधून राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Voilence : 'दुसऱ्यांना वाचवण्याच्या नादात माझ्या मुलाने जीव गमावला'
China Coronavirus : जगाला 'कोरोना'चा विळखा! आरोग्यमंत्र्यांनाच झाली लागण
Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण'
Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी
Delhi Violence: आप नगरसेवक ताहीर हुसैन यांच्या घरात सापडला दगड-विटा, पेट्रोल बॉम्बचा साठा