कोरोना प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी ती कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे येईल याबाबतचा कोणताही पुरावा नसल्याचं वैज्ञानिकांनी म्हटंल आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिस्क अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेपेक्षा सध्या दुसऱ्या लाटेकडेच लक्ष देऊन कोरोना संदर्भातील सर्व प्रोटोकॉलचं काटेकोरपणे पालन करण्यावर भर द्यायला हवं, असं म्हटलं आहे.
कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिअंट आणि संभाव्य तिसरी लाट याचा काहीच संबंध नाही. तसा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असंही डॉ. अग्रवाल म्हणाले. त्यांच्या संस्थेनं महाराष्ट्रात जून महिन्यात ३,५०० हून अधिक नमुन्यांचं परीक्षण केलं आहे. यात एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांचाही समावेश होता. डेल्टा प्लस व्हेरिअंटचा धोका वाढतोय हे नक्की आहे. पण याचे रुग्ण एक टक्क्यापेक्षाही कमी असतील, असंही ते म्हणाले.
देशात ४० हून अधिक डेल्टा प्लसचे रुग्णदेशात सध्या डेल्टा प्लस व्हेरिअंटचे ४० रुग्ण आढळून आले आहेत. पण यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे तिथं खूप जास्त प्रसार झाल्याचं आढळून आलेलं नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. सराकारनं महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना डेल्टा प्लस व्हेरिअंटबाबत तात्काळ नियंत्रणासाठीची पावलं उचलण्याचे आदेश दिलेले आहेत.
खूप मोठा धोका सध्या दिसत नसला असं असलं तरी याचा अर्थ गाफील राहणं असा होत नाही. देशात आज दुसऱ्या लाटेचा प्रभाव असूनही आहे. त्यामुळे दुसरी लाट संपुष्टात येईल यासाठी आधी प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. त्यासाठी आपण चिंता बाळगली पाहिजे, असं डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले