राज्यपाल वजुभाई वाला यांच्या राजीनाम्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:42 AM2018-05-20T00:42:26+5:302018-05-20T00:42:26+5:30
शरद पवार, मायावती यांची टीका
नवी दिल्ली : येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता राज्यपाल वजुभाई वाला यांनीही पद सोडावे, अशी मागणी सुरू झाली आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनीही वजुभाई वाला यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले आहे.
बहुमत नसलेल्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देणारे राज्यपाल वजुभाई वाला यांना पदाचे महत्त्व व शान घालवली आहे. ज्या पक्षाच्या नेत्याला त्यांनी मुख्यमंत्री केले, त्याला बहुमताअभावी राजीनामा द्यावा लागला. त्याच्याकडे बहुमत नाही, हे स्पष्ट होते. एवढेच नव्हे, तर काँग्रेस व जनता दलाने आमच्याकडे पुरेसे आमदार असल्याचे दाखवण्यासाठी ११७ जणांची यादी दिली होती. असे असताना वजुभाई वाला यांनी पक्षपात केला. त्यामुळे त्यांना राज्यपालपदी राहण्याचा अधिकार नाही, असे मायावती म्हणाल्या.शरद पवार यांनाही पत्रकारांही विचारले असता, त्यांनी नेमकी हीच भावना व्यक्त केली.
घटनात्मक पदांचा अपमान
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा.
मात्र त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. मोदी सरकार पुन्हा तसल्याच कोणाला तरी राज्यपालपदी बसवेल. घटनात्मक पदांचा मान न राखणे ही भाजपाची परंपरा आहे आणि सर्व नियम, संकेत पायदळी तुडवण्याचे काम राज्यपालही करताना दिसत आहेत.